फार्मसीच्या पेपरला ॲटो लॉगआऊटची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:38 AM2020-10-29T11:38:26+5:302020-10-29T11:41:00+5:30
shivaji university, educationsector, exam, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत बुधवारी बी. फार्मसी. (औषध निर्माणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या पेपरच्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काही विद्यार्थ्यांना ॲटो लॉगआऊटच्या तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. ही समस्या समजताच विद्यापीठाने ही अडचण दूर केली आणि परीक्षार्थींना वेळ वाढवून दिली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत बुधवारी बी. फार्मसी. (औषध निर्माणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या पेपरच्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काही विद्यार्थ्यांना ॲटो लॉगआऊटच्या तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. ही समस्या समजताच विद्यापीठाने ही अडचण दूर केली आणि परीक्षार्थींना वेळ वाढवून दिली.
विद्यापीठाने अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षांची सुरुवात मंगळवारपासून झाली. बी. फार्मसी सत्र आठमधील फार्मास्युटिकल्स ज्युरिसप्रोडन्सी या विषयाचा पेपर बुधवारी दुपारी दीड ते अडीच या वेळेत होता. ऑनलाईन पद्धतीने पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दहा मिनिटांमध्ये ॲटो लॉगआऊट या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले. अचानकपणे ही समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
काही विद्यार्थ्यांनी त्याबाबतची माहिती विद्यापीठाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने तातडीने कार्यवाही करत ही समस्या दूर केली. दरम्यान, या समस्येबाबतचे माहिती देणारे दूरध्वनी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आले. त्यावर ही तांत्रिक समस्या तातडीने दूर केली. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी दिली.
दुसऱ्या दिवशी ११६५७ जणांची परीक्षा
बुधवारच्या पहिल्या सत्रात बी. ई. एमएसडब्ल्यू., एमआरएस., बी. व्होक, एमबीए (रूरल मॅनेजमेंट) , तर दुसऱ्या सत्रात बी. फार्मसी, बी. टेक आणि तिसऱ्या सत्रात बी. टेक्सटाईल बॅचलर ऑफ ड्रेस मेकिंग ॲन्ड फॅशन को-ऑर्डिनेशन, बॅचलर ऑफ डिझाईन, बी. लिब., एम. लिब., बीजेसी., बी. आर्किटेक्चर, बी. व्होक या अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. ११,५२१ विद्यार्थ्यापैकी ११,५०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली. २०० विद्यार्थ्यापैकी १५७ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली.
विद्यापीठाकडून दक्षता
कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.