‘दौलत’प्रश्नी संघर्ष पेटणार
By admin | Published: April 15, 2015 12:41 AM2015-04-15T00:41:37+5:302015-04-15T00:41:37+5:30
बचाव कृती समितीचा विरोध : निविदेकडे पाठ, विक्री अटळ
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विक्रीची चर्चा सुरू आहे. परिणामी ‘दौलत’प्रश्नी पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. निविदा ९ एप्रिलला काढली आहे. मंगळवारअखेर एकही निविदा आलेली नाही. अंतिम मुदतीपर्यंत निविदा न आल्यास जिल्हा सहकारी बँक कर्जापोटी कारखान्याची विक्री करणार आहे. याची कुणकुण लागल्यामुळे ‘दौलत बचाव कृती समिती’ याविरोधात आवाज उठवीत आहे.
चुकीच्या कारभारामुळे कारखान्यावर सुमारे ३८३ कोटींचा कर्जाचा डोंगर आहे. तीन वर्षांपासून कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेचे फेब्रुवारी २०१५ अखेर ६० कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज कारखान्याकडे थकीत आहे. मध्यंतरी कर्ज वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रयत्न झाला होता.
गेल्या महिन्यात थिटे पेपर्स कंपनीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. बँकेची येणी वसुलीचा अडथळा दूर झाला आहे. वसुलीचाच एक भाग म्हणून कारखाना भाड्याने देण्यासाठी बँकेने निविदा काढली आहे. निविदा भरताना एक कोटी रुपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. याशिवाय बँकेची देणी भागवूनच कारखाना चालविण्यास घेण्याची अट आहे. त्यामुळे एकही निविदा आलेली नाही. निविदा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार (दि. १७) पर्यंत आहे.
सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कारखाना विक्रीचा पर्याय सांगितला होता. त्यामुळे शासनाकडून मदतीच्या अपेक्षाचा पदाधिकारी, सभासद, कर्मचाऱ्याचा भंग झाला आहे. ‘दौलत’ बचाव कृती समितीचा ठेव योजनेद्वारे रक्कम उभारणी सुरू केली आहे. परंतु, कर्जाची रक्कम मोठी असल्यामुळे ठेव योजनेतून किती पैसे गोळा होणार, असाही प्रश्न आहे. शासनाने हात झटकले, चालविण्यास घेणाऱ्यांनी पाठ फिरविली तर ‘दौलत’वर विक्रीची वेळ येणार, हे स्पष्ट आहे. (प्रतिनिधी)