कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून ‘फौंड्री’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 12:07 PM2021-11-29T12:07:18+5:302021-11-29T12:07:38+5:30
कच्चा मालाची वारंवार दरवाढ होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील फौंड्री उद्योजकांची अडचण वाढली आहे. त्यातच या दरवाढीनुसार ज्या मोठ्या उत्पादकांना (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स) पुरवठा केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा सुधारित दर वेळेत वाढवून मिळत नसल्याने अधिक भर पडली आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : कच्चा मालाची वारंवार दरवाढ होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील फौंड्री उद्योजकांची अडचण वाढली आहे. त्यातच या दरवाढीनुसार ज्या मोठ्या उत्पादकांना (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स) पुरवठा केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा सुधारित दर वेळेत वाढवून मिळत नसल्याने अधिक भर पडली आहे. करारानुसार काम करून देणे आवश्यक असल्याने कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून अधिकतर फौंड्री सध्या सुरू आहेत. या स्थितीमुळे उद्योजकांच्या खेळत्या भांडवलावरील ताण वाढला आहे.
कोल्हापुरातील फौंड्री उद्योजक हे आपल्या देशासह जगभरातील विविध देशांतील ॲटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या उत्पादकांना त्यांच्या मागणीनुसार कास्टिंग पुरवितात. हे मोठे उत्पादक दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या फौंड्री उद्योजक पुरवठादारांसमवेत उत्पादन, दरवाढ आदींबाबतचा करार करतात. कास्टिंग उत्पादनांसाठी लागणाऱ्या पिग आर्यन, कॉपर, निकल, सीआय स्क्रॅप, कोळसा आदी कच्चा मालाचे दर गेल्या दीड वर्षांत १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्यात १५ ते ३० दिवसांत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होतच आहे. त्यावर कोल्हापुरातील उद्योजक हे कच्चा मालाचे दर ज्या प्रमाणात वाढतात, त्या प्रमाणात उत्पादनाचे सुधारित दर मिळावेत, अशी विनंती या मोठ्या उत्पादकांना करतात. त्यानंतर या उत्पादकांकडून सुधारित दर मिळण्यास दोन ते तीन महिने लागतात. तोपर्यंत पुन्हा कच्चा मालाचे दर वाढतात. त्यामुळे फौंड्री उद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
आठवड्यातील दोन दिवस फौंड्री बंद
उद्योजकांकडील ऑडर्सचे प्रमाण चांगले आहे. याबाबत करारानुसार काम करण्यासाठी, उद्योग सुरू ठेवण्याकरिता काही उद्योजकांनी कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून फौंड्री सुरू ठेवल्या आहेत. सुधारित दर वेळेत मिळत नसल्याने काही उद्योजकांनी नुकसान कमी करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस फौंड्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योजक म्हणतात?
कच्चा मालाच्या दरवाढीने कोल्हापुरातील फौंड्री उद्योजकांची मोठी अडचण झाली आहे. त्यातून दिलासा मिळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने हे दर नियंत्रणात आणावेत. मोठ्या उत्पादकांनी सुधारित दर वेळेत देणे आवश्यक आहे. -मोहन पंडितराव, अध्यक्ष, गोशिमा
मोठ्या उत्पादकांकडून सुधारित दर मिळेपर्यंत पुन्हा कच्चा मालाचे दर वाढतात. त्यामुळे फौंड्री सुरू ठेवण्यासाठी आर्थिक ताळमेळ हा कर्ज काढून, शिलकीतील रक्कम वापरून उद्योजक करत आहेत. ज्या उद्योजकांना हे करणे शक्य त्यांनी आठवड्यातून दोन दिवस फौंड्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा मालाची दरवाढ नियंत्रित ठेवण्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. -शामसुंदर देशिंगकर, उद्योजक
उत्पादनांचा पुरवठा केल्यानंतर पेमेंट मिळत असल्याने आणि सुधारित दर मिळण्यास वेळ लागत असल्याने फौंड्री उद्योजकांची अडचण अधिक वाढली आहे. उद्योजकांच्या खेळत्या भांडवलावरील ताण वाढत आहे. सुधारित दर वेळेत मिळाल्यास फौंड्री नियमित सुरू ठेवण्यास बळ मिळेल. -संजय पेंडसे, अध्यक्ष, मॅक
आकडेवारी दृष्टिक्षेपात
कोल्हापूर विभागातील फौंड्रींची संख्या : ३००
कामगारांची संख्या : दीड लाख
दरमहा उत्पादन : ७५ हजार टन
वार्षिक उलाढाल : एक हजार कोटी