पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:42+5:302021-02-06T04:44:42+5:30

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचेही गांभीर्य नाही अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणास ...

The problem of Panchganga river pollution is complex | पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल

googlenewsNext

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचेही गांभीर्य नाही

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांकडून राजरोसपणे औद्योगिक व नागरी सांडपाणी नदीमध्ये सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कागदोपत्री सोपस्कार पार पाडले असले, तरी प्रदूषण मात्र सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचेही कोणाला गांभीर्य नाही. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल बनला आहे.

शहरातील काळा ओढा व कलानगर-चंदूर ओढा येथून शुक्रवारीही प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत होते. कलानगर-चंदूर मार्गावरील मोठ्या सारण गटारीतून अतिशय गडद रंगाचे व उग्र वासाचे औद्योगिक सांडपाणी ओढ्यामध्ये मिसळत होते. तेथून हा ओढा पंचगंगा नदीत मिसळतो. इचलकरंजी शहराच्या अलीकडे चंदूर हद्दीलगत हा ओढा पंचगंगा नदीत मिसळत असल्याने हे पाणी फिरून इचलकरंजी शहरालाही येते. त्यामुळे ज्यावेळी पंचगंगा नदीतून उपसा असेल, तेव्हा हेच पाणी इचलकरंजीलाही प्यावे लागते.

शहर ओलांडून थोडे पुढे गेल्यानंतर टाकवडे हद्दीलगत काळा ओढा मिसळतो. या काळ्या ओढ्यातून इचलकरंजीच्या प्रक्रिया केलेल्या औद्योगिक सांडपाण्यासह मैलायुक्त घरगुती सांडपाणी किरकोळ जुजबी प्रक्रिया करून सध्या पंचगंगा नदीत मिसळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून टाकवडे वेस येथील पंपिंग हाऊसमधील दुरूस्तीचे काम सुरू होते, ते आठ दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. तेथून उपसा केलेले पाणी मैलखड्डा येथील एसटीपी प्रकल्पावर नेले जाते. तेथे ढवळून त्यामध्ये सिंटेक्स टाकीमधून क्लोरिनचा डोस मिसळून कालबाह्य प्रक्रिया करून काळ्या ओढ्यात सोडण्यात येत आहे. एसटीपी प्रकल्पासाठीचे क्लोरिन हाऊस गेल्या काही वर्षांपासून बंदच आहे.

याबाबत विविध सामाजिक कार्यकर्ते, संघटना व दैनिकांनी वेळोवेळी आवाज उठविला. काहीजणांनी आंदोलने केली. तरीही प्रदूषण करणाऱ्या संबंधित घटकांना व प्रदूषण नियंत्रण मंडळाला काहीच फरक पडत नाही, असे दिसत आहे.

चौकटी

जुजबी कारवाई ; जुजबी प्रक्रिया

शहराच्या एसटीपी प्रकल्पाच्या ठेकेदाराला नगरपालिकेने वारंवार सूचना देऊनही काहीही फरक पडत नाही. त्यामुळे जुजबी कारवाई व जुजबी प्रक्रिया असाच प्रकार सुरू आहे. यांच्या या खेळखंडोब्यात शहराच्या खालील बाजूस असणाऱ्या गावांना मात्र प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे.

कायमस्वरुपी उपाययोजनांची गरज

मुख्यमंत्र्यांनी प्रदूषणास जबाबदार घटकांना टाळे ठोका, अशा सूचना दिल्या. परंतु त्यावर अवलंबून असणारे कामगार, अन्य घटक, त्याचबरोबर वस्त्रोद्योगातील साखळीतील एक घटक बंद झाल्याने उर्वरित सर्वच घटकांवर होणारा परिणाम या सर्वांचा विचार करून त्यावर झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देऊन कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे बनले आहे.

फोटो ओळी

०५०२२०२१-आयसीएच-०२

०५०२२०२१-आयसीएच-०३

०५०२२०२१-आयसीएच-०४

०५०२२०२१-आयसीएच-०५

कलानगर-चंदूर मार्गावरील सारण गटारीतून गडद रंगाचे व उग्र वासाचे औद्योगिक सांडपाणी ओढ्याला मिसळत आहे.

०५०२२०२१-आयसीएच-०६

०५०२२०२१-आयसीएच-०७

०५०२२०२१-आयसीएच-०८

इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे.

(छाया-उत्तम पाटील)

Web Title: The problem of Panchganga river pollution is complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.