रस्त्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबितच

By admin | Published: October 6, 2015 08:38 PM2015-10-06T20:38:42+5:302015-10-06T23:47:20+5:30

शिरोली-सांगली मार्ग : घोडावत उद्योग समूहाची चौपदरीकरणाच्या धर्तीवर रस्ता सुशोभीकरण करून देण्याची तयारी, बांधकाम आणि सुप्रीम कंपनीमधील वादामुळे निर्णय नाही

The problem of road beautification is pending | रस्त्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबितच

रस्त्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबितच

Next

दत्ता बिडकर- हातकणंगले -कोल्हापूर- सांगली चौपदरीकरणामध्ये हजारो झाडांची कत्तल झाली. गेल्या दोन वर्षांत एकही नवीन झाड लावले नाही. ठेकेदार सुप्रीम कंपनीने रस्ता दुभाजकावरही फायबरचे जाहिरात फलक लावले आहेत. घोडावत उद्योग समूहाने शिरोली ते सांगली दरम्यान, पुणे-बंगलोर चौपदरीकरणाच्या धर्तीवर रस्ता सुशोभीकरण करून देण्याची तयारी दाखविली आहे; मात्र, बांधकाम आणि सुप्रीम कंपनीमधील वादाने रस्ता सुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबित पडला आहे.
कोल्हापूर - सांगली चौपदरीकरणात शिरोली ते अंकली दरम्यानच्या गावांच्या रस्त्याकडेच्या जमिनीचे भूसंपादन करताना दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे समान भूसंपादन करण्यात आले. यावेळी रस्त्याकडेची संपूर्ण झाडे तोडून चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. ठेकेदार कंपनीने एकास दहा झाडे लावून देण्याचे कबूल केले होते; मात्र गेल्या तीन वर्षांत कंपनीकडून झाडे लावली नसल्याने पर्यावरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे.
कोल्हापूर - सांगली चौपदरीकरणामध्ये पूर्ण झालेल्या रस्त्यामध्ये एक मीटरचा रस्ता दुभाजक ठेवण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वाहनधारकांना त्रास होतो आहे. एक मीटरऐवजी दोन मीटरचा रस्ता दुभाजक ठेवून पुणे-बंगलोर चौपदरीकरणाच्या धर्तीवर दोन मीटरचा दुभाजक ठेवून झाडे लावून रस्ता सुशोभीकरण करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
शिरोली ते सांगली दरम्यानचा रस्ता घोडावत उद्योग समूह तीन कोटी रुपये खर्च करून झाडे लावून सुशोभीकरण करण्यास तयार आहे. तसा प्रस्ताव त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे. यासाठी येणारा खर्च घोडावत उद्योग समूह मोफत करून देणार आहे; मात्र यासाठी रस्ता दुभाजकाची रुंदी एकऐवजी दोन मीटर करण्याची अट घातल्यामुळे ठेकेदार सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची पंचायत झाली आहे.
कोल्हापूर - सांगली चौपदरीकरणाच्या अंदाजपत्रकामध्ये एक मीटरचा दुभाजक असल्याने ठेकेदार सुप्रीम कंपनी अडचणीत आली आहे. दोन मीटरचा दुभाजक करायचा झाल्यास नव्याने पुन्हा भूसंपादन करावे लागणार आहे. यामुळे परत अंदाजपत्रकीय किंमत वाढणार आहे. वाढलेल्या किमतीला सार्वजनिक बांधकाम विभाग मंजुरी देणार नाही, हे ओळखून ठेकेदार सुप्रीम कंपनीने रस्ता दुभाजकावर झाडे लावण्यास आणि सुशोभीकरण करण्यास नकार दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शशिकांत खवरे शिरोली यांच्याशी रस्ता व झाडे आणि सुशोभीकरणबाबत संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणामध्ये हजारो झाडांची कत्तल झाली आहे. ठेकेदार सुप्रीम कंपनीने एक मीटरच्या रस्ता दुभाजकामध्ये फायबरचे जाहिरात फलक लावले आहेत. यातून कंपनी हजारो रुपये मिळविणार आहे. एक मीटरच्या रस्ता दुभाजकामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालविताना त्रास होतो आहे. घोडावत कॉलेजसमोर ठेकेदार कंपनी झाडे लावते आणि इतर ठिकाणी फायबर फलक लावून पैसे कमवत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. यासंदर्भात कंपनीला दसऱ्यापर्यंत मुदत दिली आहे.


वाहनधारकांना समोरील वाहनांच्या लाईटचा त्रास कमी होईल
ठेकेदार सुप्रीम कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या दोन वर्षांत झाडे लावली होती, कमी पाऊस पडल्याामुळे थोडी फार जगली आहेत.

कोल्हापूर-सांगली रस्ता अंदाजपत्रकानुसार एक मीटरचे रस्ता दुभाजक आहेत. रस्ता सुशोभीकरण करण्यासाठी दोन मीटरचे दुभाजक असावे लागतात आणि रस्ता दुभाजकाची उंची एक मीटरने वाढवावी लागते.
दोन मीटरने पुन्हा दुभाजक करावा लागला, तर अंदाजपत्रकीय रक्कम वाढणार आहे. यामुळे खर्च वाढणार आहे. यास शासनाच्या मंजुरीची गरज आहे.

एक मीटरच्या रस्ता दुभाजकावर फायबर होर्डिंग लावल्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनधारकांना समोरील वाहनांच्या लाईटचा त्रास होऊ नये, असा उद्देश असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.

Web Title: The problem of road beautification is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.