कचऱ्याच्या जागेचा प्रश्न खोळंबला

By admin | Published: May 10, 2017 12:20 AM2017-05-10T00:20:28+5:302017-05-10T00:26:51+5:30

शहरातील कचरा प्रश्न गंभीर : जयसिंगपूर पालिकेकडे जागेचे नऊ प्रस्ताव

The problem of waste space is left untouched | कचऱ्याच्या जागेचा प्रश्न खोळंबला

कचऱ्याच्या जागेचा प्रश्न खोळंबला

Next

संदीप बावचे ।  --लोकमत न्यूज नेटवर्क --जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जागेशिवाय पर्याय नाही. जागा खरेदी करणे आणि त्याठिकाणी कचरा टाकणे हाच प्रश्न पालिकेसमोर असला तरी पालिकेने निविदा काढून प्रस्ताव मागविले होते. यामध्ये तब्बल नऊ जागेचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत जमीन भाडेतत्वावर घेणे अथवा खरेदी करणे हा विषय सभेत तहकूब करण्यात आला होता. त्यामुळे सध्या नवीन जागेचा प्रश्न पुन्हा खोळंबला आहे.
१ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात होता. पालिका प्रशासनाकडून कचरा टाकण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून कचराकुंड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे कचरा प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले होते. कचराकुंड्या भरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. कचऱ्याचे साचलेले ढीग त्यावर तुटून पडलेली डुकरे व गाढवे हे चित्र शहरात दिसत होते. दररोज संकलित होणारा सुमारे १६ टन कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पालिकेसमोर पुन्हा आ वासून उभा राहिला आहे. दरम्यान, खामकर मळ्यातच पुन्हा हा कचरा टाकला जात असला तरी हा तात्पुरताच पर्याय आहे. सांगली महापालिकेच्या कचरा डेपोत कचरा टाकण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. कचऱ्याप्रश्नी प्रशासनच टार्गेट होत आहे.
दरम्यान, ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सपाटीकरण जमिनीचा शोध पालिकेकडून घेतला जात आहे. शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर अशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी, मिळकतधारकांनी कागदपत्रासह पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन निविदेद्वारे करण्यात आले होते. तब्बल नऊ जमीनमालकांचे प्रस्ताव पालिकेकडे आले आहेत. यातील बहुतांशी जमिनी काळ्या मातीतील असल्यामुळे त्या जमिनी उपयोगाच्या ठरणार नाहीत. उर्वरित जमिनीबाबत सभेत ठराव करणे गरजेचे आहे.



सभेत विषय तहकूब
२९ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात संकलित होणारा ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणे, भूभरावासाठी जमीन भाड्याने घेणे किंवा खरेदी करणे असा विषय होता.
चौदाव्या वित्त आयोगातून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी गरजेची असल्यामुळे हा विषय सभागृहात मंजूर करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार होता. मात्र, सभेतच हा विषय तहकूब करण्यात आल्यामुळे जागेचा प्रश्न पुन्हा प्रलंबित पडला आहे.


‘ताराराणी’चे शाहू आघाडीला साकडे
१ शहरात गंभीर बनलेला कचरा प्रश्न चांगलाच गाजत आहे. त्यामुळे ताराराणी आघाडी व शाहू आघाडीने पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
२ २९ एप्रिलला झालेल्या सभेत ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद बजरंग खामकर यांनी शाहू आघाडी व उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांनी पुढाकार घेतला तर कचऱ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लागेल, अशी स्पष्टोक्ती दिली होती.
३ कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी समन्वयातून मार्ग काढावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

Web Title: The problem of waste space is left untouched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.