तुमच्या वादापेक्षा समस्या महत्त्वाच्या!
By admin | Published: March 4, 2015 12:35 AM2015-03-04T00:35:41+5:302015-03-04T00:45:34+5:30
जनता दरबारास गर्दी : नगरसेवकांच्या आवाहनास प्रतिसाद नाही
कोल्हापूर : ‘जनता दरबार’ला उपस्थित राहू नये, असे आवाहन उपमहापौर मोहन गोंजारे यांनी केले असतानाही मंगळवारी महापौरांच्या ‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करत तुमच्या वादापेक्षा आमच्या समस्या अधिक महत्त्वाच्या असल्याचे दाखवून दिले. महानगरपालिकेसमोर मंगळवारी नगरसेवकांनी महापौर माळवी यांच्या राजीनाम्यासाठी लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. तसेच उपमहापौर गोंजारे यांनी लाच प्रकरणात सापडलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी नैतिक अधिकार गमावला असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या ‘जनता दरबारा’त कोणीही जाऊ नये, असे आवाहन केले होते. तरीही पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे महापौर माळवी यांनी महापालिकेत येऊन ‘जनता दरबार’ घेतला. विशेष म्हणजे उपमहापौरांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. जनता दरबारात शंकर कामिरे, रंगराव खामकर, संजय शिंदे, संभाजी ससे, इंदुबाई रेडेकर, रूपा मंडलिक, वर्धमान ओसवाल, दिनेश जाधव, उत्तम सरनाईक यांच्यासह आदींनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक तक्रारी मांडल्या. घरगुती पाणी वापराचे बिल अधिक येत असल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. सार्वजनिक शौचालयांवरील पत्रे दुरुस्ती, मनपाच्या शाळांचे खराब झालेले दरवाजे, राजारामपुरीतील सार्वजनिक विहिरीवरील अस्वच्छता, आदींबाबत तक्रारी करण्यात आल्या.राजारामपुरीतील मैदानाबाबत इशारा
राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ च्या मैदानाबाबतही कमलाकर जगदाळे यांनी तक्रार केली. सध्या शाळा क्रमांक ९ बंद केल्यामुळे हे मैदान भाड्याने दिले जाते. त्यामुळे राजारामपुरीतील मुलांना खेळायला मैदान मिळत नाही. आता तर ते आरटीओला भाड्याने द्यायचे ठरविले जात आहे तसे झाले तर त्याविरोधात राजारामपुरीतील सर्व नागरिक महापालिकेच्या विरोधात आंदोलन करतील, असा इशारा कमलाकर जगदाळे यांनी दिला. त्यावेळी महापौरांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. जनता दरबारासाठी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, साहायक आयुक्त उमेश रणदिवे, जलअभियंता मनीष पोवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगरसेवकांचे अशोभनीय कृत्य
कोल्हापूर : महानगरपालिकेतून बाहेर पडताना मंगळवारी सूडबुद्धीने माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने काही नगरसेवकांनी केलेले कृत्य हे अशोभनीय असून, मी त्याची निंदा करते, अशा शब्दांत महापौर तृप्ती माळवी यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात महापौर माळवी यांनी म्हटले आहे की, आजवर ‘जनता दरबार’च्या माध्यमातून लोकहितांची कामे करण्याचा मान महापौर म्हणून मला मिळाला. महापौर म्हणून काम करत असताना राजकीय हेतूने मला लाच प्रकरणात गोवण्यात आले. हे राजकीय षङ्यंत्र असल्याचे मी वारंवार सांगितले आहे. मंगळवारी मी ठरल्याप्रमाणे जनता दरबार संपल्यानंतर महापालिकेतून बाहेर पडत असताना सूडबुद्धीने माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने काही नगरसेवकांनी खालच्या पातळीवर जाऊन अशोभनीय कृत्य केले.
मी एक विधवा महिला आहे म्हणून राजकीय द्वेषापोटी दबावतंत्राचा वापर करत आहेत. अशाप्रकारचा कोणताही दबाव माझ्या लोकहिताच्या कामांना अडथळा ठरू शकत नाही. या हल्ल्याला न घाबरता मी माझे लोकहिताचे व सामाजिक काम अधिक जोमाने करणार आहे. नगरसेवकांनी वैयक्तिक टीका व निंदनीय हल्ले करण्यापेक्षा लोकहिताची कामे करुया, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)