लक्ष्मीपुरी परिसरात समस्यांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:50 AM2017-09-11T00:50:05+5:302017-09-11T00:50:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात सोयीसुविधा पोहोचल्या. वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते झाले. खेडेगावांनी विकासासाठी कुस बदलली. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असणाºया लक्ष्मीपुरी परिसराला मात्र अनेक गैरसोयींनी घेरले असून, अतिदुर्गम आणि अतिदुर्लक्षित भाग असल्यासारखी येथे परिस्थिती तयार झाली आहे. महापालिका अधिकाºयांचे दुर्लक्ष, निधीची कमतरता यामुळे ही परिस्थिती उद्भवली असली तरी किती दिवस नागरिकांनी अशा गैरसोयींचा सामना करायचा असा संतप्त सवाल येथे विचारला जात आहे.
एकीकडे शहरात सगळीकडे सुधारणा होत आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेज होत आहेत. वाहतुकीचे नियोजन केले जात आहे; पण लक्ष्मीपुरीला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याने व्यावसायिक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मुळात लक्ष्मीपुरी परिसर हा सखल भागात असल्याने शहरात मोठा पाऊस झाला की, मिरजकर तिकटी, शिवाजी पुतळा, महानगरपालिका कार्यालय, बिंदू चौक, आदी परिसरातील पाणी थेट लक्ष्मीपुरीत घुसते आणि तेथे एखाद्या तळ्याचे स्वरूप येते. पाऊस उघडल्यानंतर हे पाणी लगेच निचरा होत नाही, तर ठिकठिकाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यात ड्रेनेजचेही सांडपाणी जाऊन मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. डास, कीटक यांचे साम्राज्य निर्माण होते.
या परिसरातील मोठ्या गटारी, ड्रेनेज यांची झाकणे बºयाच ठिकाणी तुटून पडली आहेत. त्यामुळे ती उघडीच राहिली आहेत. मोठा पाऊस झाला की त्याचा अंदाज येत नाही. कोणी तरी गटारीत पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. काही गटारींवर मोठे लांबडे दगड ठेवून झाकले आहेत; परंतु या दगडावरून वाहने गेल्यास अपघात होण्याचीही शक्यता आहे. अनेक वेळा गटारी तुंबल्यामुळे त्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत राहते.
रस्त्यावर सहा-सहा इंचांपर्यंत खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याची खडी निघून गेली असल्याने खाचखळगे झाले आहेत. खड्डे पडलेल्या रस्त्यात पावसाचे पाणी अनेक दिवस तुंबून राहते. त्यामुळे परिसरात दलदल ही कायमची डोकेदुखी आहे.
फेरीवाल्यांचे भर रस्त्यावर झालेले अतिक्रमण, माल वाहतूक करणाºया ट्रक, टेम्पो, अवजड वाहनांची दिवसभर असणारी रहदारी ही वाहतुकीची गंभीर समस्या आहे. दुचाकीसह अन्य चारचाकी वाहनांच्या पार्किंगचे कोणतेच नियोजन येथे नसल्याने वाहतुकीची कायम कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यातच श्रमिक हॉलच्या समोरील रस्त्यावर अनेकांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. भर रस्त्यावरच वाहने दुरुस्तीचे काम केले जाते. त्यामुळे अशा कोंडी झालेल्या परिस्थितूनच वाहनधारक, पादचाºयांना मार्ग काढावा लागतो.