माहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:33 PM2019-01-29T17:33:46+5:302019-01-29T17:38:48+5:30
इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे विविधांगी माहिती वेगाने उपलब्ध होत आहे. त्या माहितीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याचे काम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मंगळवारी येथे केले.
कोल्हापूर : इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे विविधांगी माहिती वेगाने उपलब्ध होत आहे. त्या माहितीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याचे काम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे आयोजित दोनदिवसीय ‘राज्यस्तरीय पत्रकारिता विद्यार्थी काँग्रेस २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निलांबरी सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई होते. ‘फेक न्यूज : मिसइन्फर्मेशन अँड डिसइन्फर्मेशन’ या संकल्पनेवर विद्यार्थी काँग्रेस आयोजित केली आहे.
संपादक वसंत भोसले म्हणाले, माध्यम क्षेत्रात सध्या काहीसे गोंधळाचे, अविश्वासाचे वातावरण आहे. अशा स्थितीत फेक न्यूज, चुकीच्या माहितीचे प्रसारण रोखण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी ‘विद्यार्थी काँग्रेस’ आयोजनाचा उपक्रम उल्लेखनीय आहे. पूर्वी बातम्यांसाठी माहिती संकलित करण्याकरिता फारशी साधने उपलब्ध नव्हती; त्यामुळे एखादी माहिती मिळविण्यासाठी खूप यातायात करावी लागत होती. मात्र, आता इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्टफोन, आदींमुळे कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध होते.
या तंत्रज्ञानाची ही एक चांगली बाजू आहे. मात्र, दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट बातम्या, चुकीची माहिती प्रसारित करण्याचे प्रकारही वाढले आहेत. ते टाळण्यासाठी आपल्याला उपलब्ध झालेल्या माहितीची सत्यता तपासून पाहावी. बदलत्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात आणि सहजपणे उपलब्ध होत असलेल्या माहितीचा योग्य पद्धतीने वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे काम माध्यमे आणि पत्रकारांकडून व्हावे.
ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई म्हणाले, पत्रकारिता हे क्षणाक्षणाला नवे आव्हान निर्माण करणारे क्षेत्र आहे. पत्रकारितेचे शिक्षण, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण पत्रकार कशासाठी होणार, याचा आधी विचार करावा. आत्मपरीक्षण आणि मूल्ये निश्चित करावीत. मूल्ये निश्चित नसतील, तर फेक न्यूज निर्माण करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच राहील.
या ‘विद्यार्थी काँग्रेस’चे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोपाला पाणी घालून झाले. पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते झाले.
शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय पत्रकारिता विद्यार्थी काँग्रेस २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून शिवाजी जाधव, प्रसाद प्रभू, राजेंद्र पारिजात, सुभाष देसाई, निशा पवार उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)
यावेळी इंटरनेटतज्ज्ञ डॉ. राजेंद्र पारिजात, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू प्रमुख उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. या विद्यार्थी काँग्रेसमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मुंबईतील पत्रकारितेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
विशेष कक्षाचे उद्घाटन
मोबाईलचा गैरवापर टाळण्याबाबत प्रबोधन करणाऱ्या पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विशेष कक्षाचे उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अजय दुधाणे, आर. जे. शीतल माने यांनी मार्गदर्शन केले.