न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:34 AM2021-06-16T04:34:29+5:302021-06-16T04:34:29+5:30
जयसिंगपूर : महापुराचा फटका शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत नागरिकांचे सहा आठवड्यांत पुनर्वसन करावे, असा आदेश ...
जयसिंगपूर : महापुराचा फटका शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत नागरिकांचे सहा आठवड्यांत पुनर्वसन करावे, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा आदर करत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पूरग्रस्तांना एकत्रित करून मोठी चळवळ उभारणार असल्याची माहिती शिरोळ तालुका पुनर्वसन संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी गायकवाड म्हणाले, २०१९ च्या महापुराचा शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा, करवीर, चंदगड या तालुक्यांना फटका बसला होता. यामध्ये हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही महापूर येण्याची शक्यता आहे. अशावेळी शासनाकडून तुटपुंजी मदत होते व कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे पुनर्वसन संघटनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रशासनाला सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु अजूनही त्या विषयावर कोणतीही हालचाल नाही. तातडीने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा. त्यासाठी आम्ही मंत्री व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. या वेळी धनंजय माळी, वैभव गोरे, यल्लाप्पा कांबळे, गोपीचंद गवळी, शुभम चव्हाण, प्रकाश तगारे, रामदास भंडारे, सतीश चव्हाण, सुरेश तगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.