शिवाजी विद्यापीठाकडून ‘दूरस्थ’बाबत अटींच्या पूर्ततेची कार्यवाही : देवानंद शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:51 AM2018-08-14T10:51:06+5:302018-08-14T10:53:56+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.
युजीसीच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोने विविध ३५ विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे. याबाबत कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, युजीसीने काही नवीन बदल केले आहेत. त्यानुसार दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विविध अटींची पूर्तता करावी लागत आहे. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य, काही पदांची भरती, आदींचा समावेश आहे.
अभ्यासक्रमनिहाय विविध अटी आहेत. त्यासह काही त्रुटींची देखील युजीसीकडून माहिती दिली जाते. या अटी आणि त्रुटींची पूर्तता होईल, त्या पद्धतीने अभ्यासक्रमांना मान्यता मिळणार आहे. या अंतर्गत यावर्षी विद्यापीठाला बी. ए. भाग एक अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. उर्वरित अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव विद्यापीठाने सादर केला आहे. त्यानुसार संबंधित अभ्यासक्रमांना मान्यता मिळेल.
दरम्यान, युजीसीने नवी दिल्ली येथे विद्यापीठांची जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठक घेतली. त्यासाठी विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमांबाबतचे सादरीकरण केले. त्यासह अभ्यासक्रमांच्या मान्यतेचा प्रस्तावदेखील सादर केला. त्यातून विद्यापीठाला केवळ बी. ए. भाग एक अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली.
अन्य अभ्यासक्रमांबाबतच्या त्रुटी आणि अटींच्या पूर्ततेबाबतचे पत्र अद्यापही युजीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले नाही. ते पत्र उपलब्ध होताच आवश्यक ती कार्यवाही विद्यापीठाकडून केली जाणार आहे.
नोकरी, व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार
विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण केंद्रातर्फे बी. ए., एम. ए. (मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, अर्धमागधी, जैनालॉजी व प्राकृत, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, सामान्य प्रशासन), बी. कॉम., एम. कॉम., एम. एस्सी. (गणित), एमबीए, पी. जी. डिप्लोमा इन ट्रान्स्लेशन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.
नोकरी, व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठीचा आधार हे दूरस्थ शिक्षण केंद्र आहे. या अभ्यासक्रमांसाठी वर्षागणिक सुमारे २४ हजार विद्यार्थी प्रवेशित होतात. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, गोवा, आदी परिसरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.