अकरावीच्या ‘सीईटी’साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:57+5:302021-07-21T04:17:57+5:30

कोल्हापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दि. ...

The process of applying for the 11th CET is underway | अकरावीच्या ‘सीईटी’साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

अकरावीच्या ‘सीईटी’साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

Next

कोल्हापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दि. २१ ऑगस्टला घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद असल्याचे दिसून आले. या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधार कोल्हापूर शहरातील विविध ३५ महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असून, ती पूर्णत: ऐच्छिक स्वरूपाची आहे. ऑफलाइन स्वरूपात होणाऱ्या सीईटीसाठी राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (एमसीक्यू) आणि ‘ओएमआर’वर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. काही विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन, तर काहींनी नेटकॅॅफेत जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पहिल्या दिवशी कमी होते. दरम्यान, सीईटीच्या आयोजनाबाबत राज्य मंडळाकडून लवकरच बैठक घेण्यात येईल. या बैठकीतील सूचनेनुसार प्रवेश परीक्षा घेण्याचे कोल्हापूर विभागामध्ये नियोजन करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले. यावर्षी कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठीची केंद्रीय प्रक्रिया सीईटीतील गुणांच्या आधारावर राबविण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर समितीकडून घेण्यात येणार असल्याचे सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

चौकट

हेल्पलाइन सुविधा

या सीईटीबाबत येणाऱ्या अडचणींसंदर्भात संबंधित घटकांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळनिहाय स्वतंत्र हेल्पलाइन सुविधा राज्य मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागात सचिव देवीदास कुलाळ (७५८८६३६३०१), सहायक सचिव सुवर्णा सावंत (८००७५९७०७१) मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: The process of applying for the 11th CET is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.