बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव समाजातर्फे मिरवणूक; ढोलताशांचा गजर, उत्साही वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:20 PM2019-05-08T12:20:26+5:302019-05-08T12:25:20+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’ असा जयघोष, ब्रास बँड, ढोलताशा, झांजपथक, धनगरी ढोलांचा गजर, लेझीम पथकांचा निनाद, सजविलेली पालखी, लवाजमा अशा उत्साही वातावरणात मंगळवारी शहरात बसवेश्वर जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली.
कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’ असा जयघोष, ब्रास बँड, ढोलताशा, झांजपथक, धनगरी ढोलांचा गजर, लेझीम पथकांचा निनाद, सजविलेली पालखी, लवाजमा अशा उत्साही वातावरणात मंगळवारी शहरात बसवेश्वर जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली.
वीरशैव लिंगायत समाजातर्फे आयोजित या मिरवणुकीचा प्रारंभ सायंकाळी साडेपाच वाजता चित्रदुर्ग मठापासून महापौर सरिता मोरे, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शुभलक्ष्मी कोरे, प्रतिमा पाटील, नगरसेविका उमा बनछोडे प्रमुख उपस्थित होत्या. उद्योजक आशिष व प्रियांका गाताडे यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांची मूर्ती होती. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जयघोषात मिरवणूक पुढे सरकत राहिली.
मिरवणूक मार्गावर भाविक थांबून पालखीचे दर्शन घेत होते. विविध मंडळांनी आकर्षक रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणुकीचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी, महात्मा बसवेश्वर, अक्कमहादेवी, महाराणी ताराबाई यांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार बालचमूंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गुलाबी फेटे परिधान करून समाजबांधव, भगिनी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका, काळाइमाम तालीम, गवळी गल्ली, तेली गल्ली, बुरुड गल्ली, नष्टे गल्ली, शनिवार पेठ पोस्ट, सीपीआर रुग्णालयमार्गे आलेल्या मिरवणुकीचा चित्रदुर्ग मठात समारोप झाला.
मिरवणुकीत वीरशैव बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, सचिव राजू वाली, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास शेंडे, अॅड. सतीश खोतलांडे, नानासाहेब नष्टे, सुभाष चौगुले, राजेश पाटील, बाळासाहेब शेटे, चंद्रकांत हळदे, किरण सांगावकर, डॉ. गिरीश कोरे, सतीश घाळी, बाळासाहेब सन्नकी, श्रीकांत बनछोडे, सुनील सावर्डेकर, भूपाल रंगभाले, गजानन सावर्डेकर, बबन गवळी, अशोक माळी, राहुल नष्टे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन वडगावकर, शकुंतला बनछोडे, इंदिरा श्रेष्ठी, प्रेमा स्वामी, संगीता करंबळी, अमृता करंबळी, सुजाता विभूते, आदी सहभागी झाले. मिरवणुकीनंतर वीणा आणि बाळासाहेब साव्यानावर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप झाले. रात्री नऊ वाजता ‘अंतरंग’ प्रस्तुत महेश हिरेमठ यांचा भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. अमित आणि श्रद्धा बाडकर यांच्या हस्ते झाले.
चित्रदुर्ग मठात विविध धार्मिक कार्यक्रम
चित्रदुर्ग मठात सकाळी सरोज आणि विजय शेटे यांच्या हस्ते वरदशंकर महापूजा झाली. प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे ‘महात्मा बसवेश्वर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे उपस्थित होते. दुपारी बारा वाजता वीणा पाटील यांच्या हस्ते बसवेश्वर जन्मकाळ व पाळणा झाला.