तीन पिढ्यांनंतर झालेल्या मुलीची मिरवणूक
By admin | Published: November 30, 2015 11:46 PM2015-11-30T23:46:32+5:302015-12-01T00:16:03+5:30
मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यवृंद होता आणि त्याच्यापाठोपाठ एका ट्रॉलीमध्ये भारतमाता, झाशीची राणी, मदर तेरेसा अशा वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी व अन्य मुली होत्या,
इचलकरंजी : जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्येविषयी शासनाकडून विशेष सजगता पाळली जात असतानाच वस्त्रनगरीत मात्र एका कुटुंबाने मुलीचा जन्म झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. अवघ्या चार दिवसांच्या मुलीची शहरातील मुख्य मार्गांवरून सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये अंगणवाडीतील विद्यार्थिनी, सेविका व मदतनीस आणि आवाज गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही भाग घेतला.जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्या होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये ओंकार ठोंबरे व प्रियांका ठोंबरे (रा. डॉ. लांडे यांच्या दवाखान्यामागे, भोनेमाळ-इचलकरंजी) या दाम्पत्याला गुरुवारी (दि. २६) एका खासगी दवाखान्यामध्ये कन्यारत्न झाले. ठोंबरे कुटुंबामध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून मुलगीच नव्हती. त्यामुळे ठोंबरे कुटुंबीयांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. दवाखान्यातून नवजात कन्येला घरी जाण्याची मुभा मिळेल, त्यादिवशी जनता चौकापासून शिवाजी पुतळा, शाहू पुतळा मार्गे भोने माळातील ठोंबरे यांच्या घरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या या निर्णयास अंगणवाडी क्र. ५६ मधील विद्यार्थिनींनी आणि आवाज गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे ठरवून पाठिंबा दिला. त्याप्रमाणे रविवारी सकाळी ठोंबरे कुटुंबीयांच्या या कन्येची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यवृंद होता आणि त्याच्यापाठोपाठ एका ट्रॉलीमध्ये भारतमाता, झाशीची राणी, मदर तेरेसा अशा वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी व अन्य मुली होत्या, तर त्यापाठोपाठ एका खासगी गाडीमध्ये कन्येला घेऊन प्रियांका ठोंबरे आणि नातेवाइक महिला बसल्या होत्या. ठोंबरे कुटुंबीयांतील अन्य मंडळींबरोबर त्यांचे नातेवाइकसुद्धा या मिरवणुकीला उपस्थित होते. कन्येची मिरवणूक पाहून अनेकांनी ठोंबरे कुटुंबीयांचे कौतुकही केले.