‘महाराष्ट्र केसरी’ची गदा आणणाऱ्या मल्लाची हत्तीवरून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:30 AM2021-02-17T04:30:10+5:302021-02-17T04:30:10+5:30
कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापूरला आणि ३६ वर्षांपासून येथील शाहू विजयी गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीच्या गदेची ...
कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापूरला आणि ३६ वर्षांपासून येथील शाहू विजयी गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीच्या गदेची प्रतीक्षा लागली आहे. ती गदा आणून ही प्रतीक्षा संपविणाऱ्या ‘गंगावेश तालमी’च्या मल्लाची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा संकल्प केला आहे. तयारी करणाऱ्या मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी या मिरवणुकीचा मी निर्णय घेतला असल्याचे कुस्ती मल्लविद्या महासंघ मुख्य प्रवक्ते आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे पैलवान संग्राम कांबळे यांनी मंगळवारी सांगितले.
शाहू विजय गंगावेश तालमीच्या अनेक मल्लांनी ‘महाराष्ट्र केसरी’ गदा यापूर्वी मिळविल्या आहेत. पहिले डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान गणपतराव खेडकरदेखील या तालमीचे होते. त्यानंतर या तालमीला महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळाल्या. गंगावेश तालीम मैदानी कुस्तीत पहिल्या क्रमांकावर असूनही गेल्या ३६ वर्षांत महाराष्ट्र केसरीची गदा आणता आलेली नाही. यावर्षी पुढील महिन्यात पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्यातील खुल्या गटात माऊली जमदाडे (महानभारत केसरी), सिकंदर शेख (महानभारत केसरी), प्रकाश बनकर (गेल्या स्पर्धेतील ९४ किलोवजन गटातील सुवर्ण पदक विजेता), दत्ता नरळे (राष्ट्रीय विजेता), भैरू माने (विद्यापीठ विजेता) हे मल्ल उतरणार असून, ते गंगावेश तालमीत सराव करीत आहेत. तालमीतील अन्य काही मल्ल इतर जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यापैकी कोणत्याही मल्लाने जर महाराष्ट्र केसरीची गदा पटकविली, तर त्याची कोल्हापुरातून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल, असे संग्राम कांबळे यांनी सांगितले.
चौकट
गेल्यावेळी हत्तीची नोंदणी
गेल्यावर्षीही तालमीच्या मल्लासाठी हत्तीवरून मिरवणूक काढण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी कर्नाटकातील हत्तीसाठी ३० हजार रुपये देऊन नोंदणी केली होती. तावडे हॉटेल कमानीजवळ हा हत्ती आणला होता. पण, स्पर्धेतील उपांत्य सामन्यात एका गुणाने माऊली जमदाडे याची संधी हुकली. त्यामुळे हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा संकल्प अपूर्ण राहिला. यावर्षी तरी हा संकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा संग्राम कांबळे यांनी व्यक्त केली.
फोटो (१६०२२०२१-कोल-संग्राम कांबळे (पैलवान) : महाराष्ट्र केसरीची गदा आणणाऱ्या शाहू विजयी गंगावेश तालमीच्या मल्लाची मिरवणूक काढण्यासाठी पैलवान संग्राम कांबळे यांनी गेल्यावर्षी तावडे हॉटेल कमानीजवळ कर्नाटकातून हत्ती आणून ठेवला होता.