अंतिम सत्राच्या परीक्षांसाठी प्रॉक्टरचा पर्याय: तांत्रिक अडचणीवेळी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:36 PM2020-09-12T12:36:53+5:302020-09-12T12:40:15+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची सूचना राज्य शासनाने विद्यापीठांना केली आहे. त्यासाठीच्या संगणक प्रणालीचा सध्या विद्यापीठांकडून शोध सुरू आहे. त्यांच्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचारी भरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेब प्रॉक्टर एक्झाम (परीक्षण परीक्षा) या संगणक प्रणालीचा पर्याय उपयुक्त ठरणारा आहे
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची सूचना राज्य शासनाने विद्यापीठांना केली आहे. त्यासाठीच्या संगणक प्रणालीचा सध्या विद्यापीठांकडून शोध सुरू आहे. त्यांच्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचारी भरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेब प्रॉक्टर एक्झाम (परीक्षण परीक्षा) या संगणक प्रणालीचा पर्याय उपयुक्त ठरणारा आहे. इंटरनेट, वीजपुरवठ्याच्या उपलब्धतेबाबतची तांत्रिक अडचण उद्भवल्यास या प्रणालीची मदत होऊ शकते.
ओएमआर (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) पद्धतीने ५० गुणांची एक तासाची ऑनलाईन आणि ऑफलाईन या पर्यांयाचा वापर करून परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठांनी घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार २२ दिवसांमध्ये परीक्षांचे कामकाज पूर्ण करावे लागणार आहे.
विद्यापीठांकडे तयारीसाठी सध्या वेळ कमी आहे. शिवाजी विद्यापीठाच्याबाबतीत विचार केल्यास दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक आहेत. काही भागामध्ये इंटरनेट, वीजपुरठ्याची खंडित होण्याची समस्या आहे.
अशा स्थितीत त्याठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे अडचणी ठरू शकते. त्याठिकाणी प्रॉक्टर प्रणालीचा वापर मदतीचा ठरू शकतो. या प्रणालीमध्ये पर्यवेक्षकाप्रमाणे काम करणारी यंत्रणा ही इनबिल्ट असते. प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाठविण्यापासून ते परीक्षेचा कालावधी संपेपर्यंतच्या सर्व नोंदी या प्रणालीमध्ये होतात. ऑनलाईन परीक्षा घेण्यातील अधिक सुरक्षित पर्याय म्हणून या प्रणालीक़डे पाहिले जाते, असे संगणकतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
असे काम करते ही प्रणाली
सर्व्हरवरून पाठविलेल्या प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर विद्यार्थ्याने मोबाईल, संगणक, लॅपटॉपवर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) टाकून क्लिक केल्यापासून संबंधित प्रणाली कार्यान्वित होते. वीजपुरवठा अथवा इंटरनेट खंडित झाल्यानंतर किंवा अन्य कोणती तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास त्याची नोंद होते. परीक्षेची वेळ संपल्यानंतर उत्तरपत्रिका आपोआप लॉक होते. प्रश्नपत्रिका कॉपी करता येत नाहीत. वेब प्रॉक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येते.
प्रॉक्टर ही प्रणाली क्लाऊड बेसड असून ती सुरक्षित आहे. त्यामध्ये गैरप्रकार करता येत नाहीत. ती परीक्षण परीक्षा प्रणाली म्हणूनही ओळखली जाते. स्टॉक एक्सचेंज, विप्रो, इन्फोसिस, आदी संस्थांमधील कर्मचारी भरतीसाठी या प्रणालीचा वापर केला जातो. सध्याच्या स्थितीत विद्यापीठांना या प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा चांगला पर्याय आहे.
-डॉ. आर. के. कामत,
संगणकशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ