गुळाचे दर पडल्याने उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 01:00 AM2017-03-02T01:00:47+5:302017-03-02T01:00:47+5:30

हंगाम अंतिम टप्प्यात : रव्यांची आवक घटली

Producer's difficulty due to falling prices | गुळाचे दर पडल्याने उत्पादक अडचणीत

गुळाचे दर पडल्याने उत्पादक अडचणीत

Next

प्रकाश पाटील --- कोपार्डे  --यावर्षी ऊस उत्पादनात घट झाल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर गुळाला शेवटच्या टप्प्यात ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला; पण साखर कारखान्यांना जाणारा ऊस गुऱ्हाळघरांसाठी खरेदी करणाऱ्या गुऱ्हाळ मालकांना गुळाचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल कमी झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. आता गूळ उत्पादन कडू झाले असल्याच्या प्रतिक्रिया गुऱ्हाळघर मालकांकडून व्यक्त होत आहेत.
मागील वर्षी मार्च ते मे पाणीटंचाई व जून ते आॅगस्ट अतिपाऊस यामुळे ऊस उत्पादन कमी झाले. आपले गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी साखर कारखान्यांनाही एफआरपीपेक्षा १७५ रुपये जादा दर द्यावा लागला. यामुळे उसउत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनाकडे पाठ फिरविली. जिल्ह्यातील १२०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ ४०० ते ५०० गुऱ्हाळघरेच सुरू झाली. पण, हंगामाच्या सुरुवातीला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर डिसेंबर ते जानेवारी दरम्यान तीन हजार रुपयांच्या खाली आल्याने शेतकरी गुऱ्हाळघरांना ऊस देईनात. या दरम्यान गुऱ्हाळघर मालकांनी स्वत:च्या मालकीच्या उसाचे गाळप करण्यास सुरुवात केली. मात्र, जानेवारी अखेरपासून पुन्हा गुळाला चांगले दर येऊ लागल्याने ऊस उत्पादकांपेक्षा गुऱ्हाळघर मालकांनीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तीन हजार ते ३५०० रुपये प्रतिटन दराने ऊस खरेदी केला. ऊस उत्पादकही आपल्या उसाचे मार्केटिंग करू लागले. साखर कारखान्यापेक्षा ४०० ते ५०० रुपये जादा दर मिळत असल्याने गुऱ्हाळघरांना वजनावर ऊस गाळपासाठी देऊ लागले.
मात्र, आठ दिवसांपासून गुळाचे दर पुन्हा गडगडले असून, ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर ३५०० रुपये ते ४००० रुपयांवर आल्याने गुऱ्हाळघर मालक पुन्हा अडचणीत सापडला आहे. अडीच क्विंटल गूळ उत्पादनाच्या एकत्रित खर्चाची बेरीज मारली असता ९ हजार ८४० रुपये खर्च येत असून, उत्पन्न मात्र १० हजार रुपयांचे मिळत असल्याने गुऱ्हाळघर मालक हबकला आहे. ‘भिक नको, पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ गुऱ्हाळघर मालकांवर आली आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्याने विकत घेतलेला ऊस गुऱ्हाळात गाळप केल्याशिवाय आता गुऱ्हाळमालकांसमोर पर्याय उरलेला नाही.

एका आदनाला अडीच क्विंटल गूळ तयार होतो
सर्वसाधारण यासाठी येणार खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या लेखाजोखा
ऊस-सव्वादोन टन (३००० रूपये टन) - ७५०० रूपये


एकूण : ९८४० रुपये खर्च

फेब्रुवारीमध्ये गुळाला मिळणारा दर पाहता तो पाच हजारांवरती पोहोचेल, असे चित्र होते. पण, ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण झाल्याने साखर कारखान्यांपेक्षा जादा दर देऊन खरेदी केलेल्या उसापासून गूळनिर्मिती तोट्यात चालली आहे. ३००० ते ३३०० रुपये दराने ऊस खरेदी केला असून, सध्याचा मिळणारा ४००० हजार रुपये दरही परवडत नाही.
- राजू वडगावकर, गुऱ्हाळघर मालक शिंदेवाडी, ता. करवीर.


जर अडीच क्विंटल गुळाला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तरी १० हजार रुपये मिळतात. आणि खर्च ९ हजार ८४० रुपये होतो. शेतकऱ्याच्या हातात उरतात केवळ १६० रुपये. यावरून गूळ उत्पादन किती तोट्याचे आहे, हे स्पष्ट होते.

Web Title: Producer's difficulty due to falling prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.