कोरोना काळात ७७६४ टन दूध भुकटीचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:06 AM2021-02-20T05:06:42+5:302021-02-20T05:06:42+5:30
कोल्हापूर : गतवर्षी कोरोना काळामध्ये दुधाच्या मागणीमध्ये मोठी घट झाल्याने प्रतिदिन दहा लाख ...
कोल्हापूर : गतवर्षी कोरोना काळामध्ये दुधाच्या मागणीमध्ये मोठी घट झाल्याने प्रतिदिन दहा लाख लिटर दूध स्वीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातून तयार झालेल्या ७७६४ मे. टन दूध भुकटीपैकी १५०० टन भुकटी ही अंगणवाड्यातील बालकांसाठी पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित ६२६४ टन भुकटी खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व भुकटी वेळेत पॅकिंग करून राज्यभर वेळेत पुरवठा करणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड १९ मुळे गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात हॉटेल, रेस्टॉरंट, मिष्ठान्न पदार्थ निर्मिती बंद राहिली. परिणामी, दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली. दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शासनाने हस्तक्षेप करत रोज १० लाख लिटर याप्रमाणे दूध खरेदी करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात ५७५० मे. टन दूध भुकटी उत्पादित झाली. ती मुक्त बाजारात न विकता एक वर्षभरामध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेद्वारे राज्यभरातील अंगणवाड्यांच्या बालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २५० ग्रॅमची पाकिटे तयार करण्यासाठी ठेकाही देण्यात आला. या ठेकेदाराकडे १३०० टन भुकटी पॅकिंगसाठी देण्यात आली असून आतापर्यंत केवळ २०० टन पॅकिंग झाले आहे. भुकटी तयार करून दहा महिने उलटून गेले आहेत. प्रतिमहिना ४०० टन भुकटीची २५० ग्रॅमची पाकिटे तयार करण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण होणे शक्य नसल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे.
त्यामुळे दहा फेब्रुवारी २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन १५०० टन अंगणवाड्यांसाठी तर उर्वरित ६२६४ टन भुकटी खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला परवानगी देण्यात आली आहे.