धान्य साठवणुकीसाठी कडुलिंबाच्या गोळ्यांची निर्मिती -: निसर्गमित्रचे अनोखे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 08:58 PM2019-12-04T20:58:54+5:302019-12-04T20:59:36+5:30
कोणत्याही कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर न करता कडूलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या किटकनाशक गुणांचा वापर करून या गोळ्यांची निर्मिती संस्थेने केली आहे.
कोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवारामार्फत पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच कृतिशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याहीवेळी संस्थेच्या प्रोत्साहनामुळे धान्य साठवणुकीसाठी कडूलिंबाच्या गोळ्या आणि घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी रद्दी आणि जुन्या साड्यांचा उपयोग करून रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध झाली आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला गृहिणींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
निसर्गमित्र परिवारामार्फत गुढीपाडव्याला वापरून झालेल्या कडूलिंबाच्या पानापासून साठवणुकीच्या धान्यात किटकनाशक म्हणून वापरावयाच्या गोळ्या तयार केल्या आहेत. कोणत्याही कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर न करता कडूलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या किटकनाशक गुणांचा वापर करून या गोळ्यांची निर्मिती संस्थेने केली आहे.
संस्थेने मंगेशकर नगर, बेलबाग, रविवार पेठ, मंडलिक वसाहत, सरनाईक वसाहत आणि महालक्ष्मीनगर परिसरातील सुमारे ६५0 परिवारांकडे या गोळ्या सुपूर्द करून या गोळ्यांची चाचणी घेतली. या गोळ्या परिणामकारकरीत्या काम करत असल्याचा अभिप्राय या परिवाराने दिला. कडूलिंबाच्या गोळ्यांची निर्मिती संस्थेचे सदस्य आणि बीवेल फॉर्मास्युटिकल कंपनीचे विलास डोर्ले यांच्यामुळे शक्य झाली. या उपक्रमाचे संयोजन पराग केमकर, अनिल चौगुले, अभय कोटणीस, विश्वास चौगुले, सुनील चौगुले, यश चौगुले, प्रफुल्ल खेडकर, अस्मिता चौगुले यांनी केले.
रद्दीपासून कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांची निर्मिती
संस्थेने घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. घरोघरी जुनी वापरलेली साडी आणि एक किलो रद्दी पेपर संस्थेकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामधून १00 हून अधिक जुन्या साड्या आणि अंदाजे २५0 किलो रद्दी संस्थेकडे जमा झाली. या साड्यांपासून प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या आणि कोरड्या पदार्थांसाठी रद्दीतून कागदी पिशव्या तयार करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.
महिला बचत गटांना रोजगाराची संधी
टाकाऊ वस्तूंचा वापर करून कापडी आणि कागदी पिशव्या निर्मितीद्वारे महिला मंडळ, महिला बचत गट यांच्याकरिता कायमस्वरूपी रोजगाराची उत्तम संधी यानिमित्ताने निर्माण झाली आहे.