आजरा-चंदगडमधील काजूगरांचे उत्पादन ठप्प
By admin | Published: April 25, 2016 12:35 AM2016-04-25T00:35:50+5:302016-04-25T00:54:03+5:30
उत्पादन घटले : बियांचा दर भडकल्याने ४०० कारखाने बंद
कृष्णा सावंत --पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांसाठी तरुण बेरोजगारांना संजीवनी देणारा काजू प्रक्रिया उद्योग सध्या संकटात सापडला असून, काजू उत्पादन घटल्याने दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४०० पेक्षा अधिक कारखान्यांतील काजूगरांचे उत्पादन ठप्प झाले आहे.
हंगामाच्या सुरुवातीस झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने बियांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे वाटत होते. मात्र, अचानक सातत्याने दव पडू लागल्याने यावर्षी काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत १३० वरून १५० पर्यंत बियांचा दर भडकल्याने चंदगड व आजरा तालुक्यांतील लहान-मोठ्या ४०० पेक्षा अधिक कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत.
आजरा व चंदगड काजू उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. काजूगरांच्या गुणवत्तेची प्रत चांगली असल्याने दोन्ही तालुक्यांतील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना, तसेच महिलांना रोजगार निर्मितीचे हक्काचे साधन बनले आहे. दरवर्षी किरकोळ स्वरूपात चढ-उतार असला तरी कारखाने टिकून आहेत. मात्र, यावर्षी बियांच्या दराच्या प्रमाणात काजूगरांना दर मिळत नसल्याने कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांच्याही रोजगारावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, उत्पादन घटल्याने गरीब व छोटे शेतकरी अडचणीत सापडले आहेत; तर मोठ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
काजू उत्पादन घटीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचीही घसरण झाली आहे. त्यामुळे गरांच्या किमतीत अपेक्षित वाढ झालेली नाही. या दोन्ही कारणांमुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
- बाळू जोशी, काजू उद्योजक, आजरा