क्षारपडमुक्त करून घेतले उसाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:21+5:302021-03-23T04:24:21+5:30
शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी ...
शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी राजाराम मारुती जाधव यांची गेली ४० वर्षे जमीन क्षारपड बनली होती. दत्त उद्योग समूहाच्यावतीने जमीन क्षारपडमुक्त करून तब्बल ४० वर्षांनंतर ३५ गुंठे क्षेत्रात ३७ टन उसाचे प्रथमच उत्पन्न घेतले.
दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, येणाऱ्या पिढीला शेतीविषयी जागरुकता व आवड निर्माण करण्याकरिता दत्त उद्योग समूह नेहमीच युवकांच्या सोबत असेल. क्षारपडमुक्त प्रकल्प हा निश्चितच शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शेतकरी जाधव यांनी आपली जमीन पिकाखाली आल्याबद्दल दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी दत्तचे संचालक प्रमोद पाटील, मानसिंग तिटवे, सतपाल खोंद्रे, जमील जमादार, बाबासाहेब भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कोट - क्षारपडमुक्त प्रकल्पामुळे माझ्या शेतीचा कायापालट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून क्षारपडमुळे जमीन नापीक बनली होती. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून क्षारपडमुक्त योजनेतून जमीन पिकाखाली आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा इतरही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- राजाराम जाधव, शेतकरी, घालवाड
फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी राजाराम जाधव यांनी क्षारपडमुक्त प्रकल्प राबवून जमिनीतून उसाचे भरघोस उत्पन्न मिळविले. याबद्दल त्यांनी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले, तर दुसऱ्या छायाचित्रात शेतकरी राजाराम जाधव आपल्या शेतातील ऊस दाखविताना.