पर्यावरणपूरक, आरोग्यदायी चुलींची निर्मिती
By admin | Published: July 22, 2014 11:44 PM2014-07-22T23:44:19+5:302014-07-23T00:05:30+5:30
वसगडेतील राजाराम कुंभार यांचा उपक्रम : जेवणाच्या अस्सल चवीसाठी सुधारित चूल
शिवाजी कोळी - वसगडे
पारंपरिक चुलीच्या वापराने होणाऱ्या धुरामुळे मानवी आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम आणि सरपणासाठी मोठ्या प्रमाणावरील झाडांच्या कत्तलीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा या उद्देशाने वसगडे (ता. करवीर) येथील राजाराम बापू कुंभार यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी सुधारित चुलीची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुधारित चूल परिषदेच्यावतीने कुंभार यांच्या चुलीची निवड करण्यात आल्याने ‘जेवणाचा अस्सल चवीसाठी सुधारित चुली लई भारी, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
वसगडे येथील राजाराम कुंभार यांनी सुधारित निरधूर चुलींची
निर्मिती केली आहे. या चुलींच्या वापरामुळे घरात अजिबात धूर होत नाही. ८० टक्के ऊर्जा चुलीवरील भांड्याला, तर २० टक्के ऊर्जा वाईलकडे वळत असल्याने १०० टक्के ऊर्जेचा वापर होतो. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सुधारित चुलीवर एकाचवेळी दोन ठिकाणी स्वयंपाक करता येत असल्याने वेळेची
बचत होते.
२०११ मध्ये करवीर तालुका ग्रामोद्योग संघाचा आदर्श ग्रामीण कारागीर पुरस्कार त्यांना मिळाला. अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमातही कुंभार यांच्या चुलीची निवड झाली. अप्रोप्रिएट सरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट पुणे यांच्यावतीने कुंभार यांना सन्मानित करण्यात आले.