देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन, अद्याप ६७ कारखान्यांचे गाळप सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 07:09 AM2023-05-11T07:09:51+5:302023-05-11T07:10:17+5:30
देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.
उत्तर प्रदेशात १०१.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून कर्नाटकात ५५.५० लाख टन तर तामिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ लाख टन व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरयाणा (७.१५ लाख टन),पंजाब (६.६५ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.
देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिना अखेरपर्यंत चालेल व त्यातून सुमारे ३२७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन होईल. या व्यतिरिक्त सुमारे ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल असा अंदाज आहे.’
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
उताऱ्यात महाराष्ट्र चौथा
देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये १०.८० टक्के असून त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणात तो १०.१० टक्के, तर महाराष्ट्रात १० टक्के आहे. यानंतर आंध्र प्रदेश, बिहारमध्ये प्रत्येकी ९.७० टक्के,उत्तर प्रदेशात ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो.