उपपदार्थांची निर्मिती हाच ‘गोकुळ’समोर पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:46 AM2018-06-25T00:46:22+5:302018-06-25T00:46:26+5:30

The production of sub-articles is the same as 'Gokul' option | उपपदार्थांची निर्मिती हाच ‘गोकुळ’समोर पर्याय

उपपदार्थांची निर्मिती हाच ‘गोकुळ’समोर पर्याय

googlenewsNext

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गाईच्या अतिरिक्त दुधाचे संकट संपूर्ण देशावर आहे. दूध पावडरचा दर आणखी सहा महिने असाच राहिला तर सहकारी दूध संघ आतबट्ट्यात येणार हे निश्चित आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून पावडर खरेदी, निर्यात अनुदानासारखी पावले उचलली तरच दूध व्यवसाय तग धरेल. असे असले तरी सरकारच्या तात्पुरत्या मलमपट्टीची वाट न पाहता ‘गोकुळ’ने दर्जेदार उपपदार्थांची निर्मिती करून ब्रॅण्ड विकसित केला, तरच हे संकट कायमस्वरूपी जाऊ शकेल, असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे.
दूध व्यवसायात अतिरिक्त दुधाचे संकट नवीन नाही. पाच-दहा वर्षांनी असा पेच निर्माण होतो; पण दूध संघांनी दीर्घकालीन आराखडा तयार करून वाटचाल ठेवली तर फारसा त्रास होत नाही. ‘अमूल’कडे पुढील दहा वर्षांचा आराखडा तयार असल्याने त्यांना अतिरिक्त दुधाची चिंता नाही. ‘अमूल’ हा राज्याचा संघ असल्याने त्यांच्याशी ‘गोकुळ’ची तुलना करता येणार नसली, तरी आगामी काळात तोच ‘गोकुळ’चा स्पर्धक आहे. त्याला तोंड देण्यासाठी त्याच ताकदीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार असला पाहिजे. ‘गोकुळ’च्या म्हैस दुधास कमालीची मागणी असली, तरी भविष्यात म्हशीचे दूध वाढून गाईसारखाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठताना केवळ दूध विक्री एवढेच ध्येय ठेवले, तर भविष्यात आणखी अडचणी वाढू शकतात. त्यासाठी उपपदार्थांची निर्मिती करून तो ब्रॅण्ड विकसित करण्याचे शिवधनुष्य संघाला उचलावे लागणार आहे.
अतिरिक्त दुधाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘गोकुळ’ने प्रयत्न केले पाहिजेत; पण त्याबरोबर उत्पादकांनीही आता बदलले पाहिजे. उत्पादकांनी व्यावसायिकता स्वीकारून काम केले, तरच अशा अडचणीच्या काळात तो तग धरू शकेल. जागृती वाढवायला हवी
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते गाईचे दूध कमी स्निग्धतेचे असल्याने शरीरात चरबी वाढत नाही. योगगुरू रामदेव बाबाही गाईच्या दुधापासून बनवलेले उपपदार्थ खाण्याचा सल्ला देतात. या गोष्टीचे मार्केटिंग दूध संघांनी करायला हवे.
दूध संघ असोसिएशनची केंद्राकडे मागणी
एक लाख टन दूध पावडर खरेदी करावी.
वर्षभर साठवून ठेवल्याने गोडावूनमधील दूधपावडर मुदतबा' झाली आहे, तिच्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनुदान द्यावे.
शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेत या पावडरचा समावेश करावा.
प्रतिकिलो ५० ते ६० रुपये निर्यात अनुदान द्यावे.
चीज, टेबल बटरचे उत्पादन फायदेशीर
तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न संपू शकतो
गाईच्या दुधापासून टेबल बटर व चीज चांगल्या प्रतीचे तयार होेते. बाजारात त्यांना मागणीही चांगली असल्याने संघाने त्यांचे उत्पादन केले तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न बऱ्यापैकी संपू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गाईच्या अतिरिक्त दुधाच्या संकटाची चाहूल पाच वर्षांपूर्वीच लागली होती. सर्वच दूध संघांनी त्यांच्या पातळीवर मार्ग काढला पाहिजे; पण आता सरकारची जबाबदारी आहे. दूध संघ असोसिएशनच्या वतीने मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अरुण नरके (अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन)

Web Title: The production of sub-articles is the same as 'Gokul' option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.