वेतनासाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून कामबंद
By admin | Published: March 15, 2017 04:16 PM2017-03-15T16:16:27+5:302017-03-15T16:16:27+5:30
ठिय्या आंदोलन; सहाय्यक नियंत्रकांवर कारवाईची मागणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरीत अदा करावे. वेतन थकविण्यासाठी जबाबदार असलेल्या सहाय्यक नियंत्रकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारत निदर्शने केली.
येथील कृषि महाविद्यालयात ३५ प्राध्यापक, तर १९० शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे वेतन अदा झालेले नाही. महाविद्यालयातील सहाय्यक नियंत्रक यांनी संबंधित वेतन अदा करण्याबाबत कोणतीही ठोस व सकारात्मक कार्यवाही केली नाही. वेतन थकीत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह करणे, कर्जाचे हप्ते भरणे अडचणीचे ठरले आहे. शिवाय काहींना कर्जाच्या व्याजाचा दंड नाहकपणे भरावा लागत आहे. सहाय्यक नियंत्रकांकडून झालेली नसलेल्या कार्यवाही आणि त्यामुळे वेतन थकीत राहिल्याने अखेर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी काल, मंगळवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या कुलसचिवांना घेराओ घातला. शिवाय थकीत वेतन बारा तासात अदा न झाल्यास कामबंदचा इशारा दिला. यावेळी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी वेतन त्वरीत अदा करावे. सहाय्यक नियंत्रकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देखील दिले. यानंतर वेतन अदा झाले नाही. त्यामुळे संबंधित प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला आणि कामबंद केले. या आंदोलनामुळे महाविद्यालयातील प्रशासकीय, शैक्षणिक काम ठप्प झाले. (प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या आदेशानुसार कार्यवाही
महाविद्यालयात मंगळवारी व बुधवारी झालेल्या आंदोलनाची आणि या आंदोलनकर्त्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणींबाबतचा अहवाल राहुरी कृषी विद्यापीठाला सादर केला असल्याचे सहायोगी अधिष्ठाता डॉ. जी. जी. खोत यांनी सांगितले. ते म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे वेतन अदा होवू शकले नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.