‘माहिती अधिकारा’साठी प्राध्यापकाचा लढा
By Admin | Published: March 30, 2017 06:15 PM2017-03-30T18:15:13+5:302017-03-30T18:15:13+5:30
शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात; विविध मागण्या
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : माहिती अधिकारांंतर्गत कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून माहिती दिली जात नाही. त्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी प्रा. गोवर्धन दिकोंडा यांनी गुरुवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
येथील शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर त्यांनी हे आंदोलन सुरू केले. विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हुकुमशाही, मनमानी सुरू आहे. माहिती अधिकार त्यांच्याकडून पायदळी तुडविला जात आहे. शिवाय सतत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणाऱ्या नागरिकांना माहिती दिली जात नाही. त्याच्या निषेधार्थ आणि या कार्यालयात आठवड्यातून एकदा ‘माहिती अधिकार दिन’ आयोजित करावा.
माहिती अधिकारातील कलम चारअंतर्गत असलेल्या १७ बाबी कार्यालयाबाहेर आणि आपल्या कार्यालयाच्या अखत्यारीत सर्व अनुदानित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व नागरिकांना दिसेल असे त्वरित प्रसिद्ध कराव्यात. अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांचे जे कार्य, कर्तव्य, अधिकार व जबाबदाऱ्या आहेत, त्या सुस्पष्टपणे सर्वांना निदर्शनास येईल अशा प्रसिद्ध कराव्यात, आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करीत असल्याचे प्रा. दिकोंडा यांनी सांगितले.
पारदर्शक महाराष्ट्र चळवळ आणि पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘भ्रष्टाचार निर्मूलन सैनिक व्हा’, या आवाहनाला प्रतिसाद आणि नैतिक न्यायासाठी हा लढा देत आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे. या आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही शिक्षण सहसंचालक डॉ. साळी यांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत दुर्लक्ष केले असल्याचे प्रा. दिकोंडा यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. (प्रतिनिधी)