वीस-वीस वर्षांपासून प्राध्यापक सेवेवर गैरहजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:32 PM2023-06-21T15:32:13+5:302023-06-21T15:32:37+5:30
अशा प्राध्यापकांनी कर्तव्यावर हजर व्हावे यासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण विभागावर आली
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील १६ प्राध्यापक व सहयाेगी प्राध्यापक विनापरवानगी, अनधिकृतपणे दीर्घ काळापासून गैरहजर आहेत. अशा प्राध्यापकांनी कर्तव्यावर हजर व्हावे यासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण विभागावर आली आहे.
१९ जूनला ही नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे यातील काही प्राध्यापक गेल्या २० वर्षांपासून संबंधित महाविद्यालयामध्ये कामावर गैरहजर आहेत. यात कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे. यात नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातील २, अंबाजोगाई येथील ३, मिरज येथील १, औरंगाबाद येथील ३ तसेच मुंबई, चंद्रपूर, धुळे व यवतमाळच्या महाविद्यालयातील प्रत्येकी एका प्राध्यापकाचा समावेश आहे.
१५ दिवसांची मुदत
या प्राध्यापकांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी नाेटिसीच्या दिवसापासून १५ दिवसांची मुदत दिली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात १५ दिवसांत हजर व्हावे, त्यासंदर्भातील रुजू अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर करावा. या मुदतीत रुजू न झाल्यास ते अध्यापकीय पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे गृहीत धरून त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे.
बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने नोटीस
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या वारंवार बदल्या होतात. अपेक्षेनुसार बदलीचे ठिकाण मिळाले नाही, तर अनेक जण बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत. मात्र, मूळ आस्थापनेतून त्यांना आधीच पदमुक्त केलेले असते. या १६ जणांमध्ये अशांची संख्या जास्त असल्याचे समजते.
जागांची अडवणूक कशासाठी
वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अनेक जण परीक्षेच्या माध्यमातून शासकीय महाविद्यालयांमध्ये अध्यायनासाठी रुजू होतात. त्याचवेळी ते बाहेर खासगी प्रॅक्टिसही करतात. त्यात ते स्थिरस्थावर झाले की महाविद्यालयांकडे फिरकतही नाहीत. राजीनामा न देता ते गैरहजर राहत असल्याने कागदोपत्री ते महाविद्यालयात कार्यरत असल्याचे दिसते. मात्र, वास्तवात ते हजर नसल्याने संबंधित महाविद्यालयाच्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होतो. शिवाय रिक्त जागा दिसत नसल्याने नवीन भरतीही करता येत नाही.