प्रावीण्यप्राप्त कुस्तीगीरांना मिळणार ६० हजार मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:47+5:302021-05-08T04:25:47+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रावीण्याप्राप्त वरिष्ठ गटातील कुस्तीगीरांना सुधारित मानधन ...
कोल्हापूर : राज्य शासनाने कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रावीण्याप्राप्त वरिष्ठ गटातील कुस्तीगीरांना सुधारित मानधन जाहीर केले आहे. त्यानुसार पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या मल्लास ६०, द्वितीय क्रमांकास ५५ आणि तृतीय क्रमांकास प्रत्येकी ५० हजार रुपये मिळणार आहेत.
राज्यातील कुस्ती कलेची परंपरा व कुस्तीगीरांच्या गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहनपर मानधन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तत्कालीन राज्य शासनाने २०१२ साली राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना हे मानधन देण्यास सुरुवात केली होते. ते १२०० ते १२ हजारांपर्यंत होते. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार पहिल्या क्रमांकास ६० हजार, तर द्वितीय क्रमांकास ५५ आणि कुस्तीमध्ये दोन मल्लांना तृतीय क्रमांक संयुक्तरीत्या दिला जातो. त्यानुसार तिसऱ्या क्रमांक प्राप्त कुस्तीगीरांना प्रत्येकी ५० हजार रुपये वर्षभरात मिळणार आहेत.
नव्या नियमानुसार मानधन असे,
वरिष्ठ गट फ्रीस्टाइल (माती व गादी गट) किलो गट : ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, १२५ यातील मल्लांना अनुक्रमे पहिला दुसरा आणि तृतीय क्रमांक मिळवणारे दोन्ही मल्लांना ६०, ५५ आणि ५० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
वजनी गट बदलल्यामुळे मिळाले सुधारित मानधन
जागतिक कुस्ती संघटनेने कुस्ती वजनगटात बदल केल्यामुळे कुस्ती स्पर्धांच्या वजनगटात बदल करण्याचा व मानधनाचे दर सुधारित करण्याचा प्रस्ताव क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास शुक्रवारी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने मान्यता दिली. कुस्ती स्पर्धाही नव्या गटानुसार होणार आहेत.
प्रतिक्रिया
कुस्ती मल्लांना राज्य शासनाने वाढीव मानधन जाहीर करून कुस्ती जोपासण्यासाठी जणू बूस्टर डोस दिला आहे. राज्य शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कुस्तीला त्यातून बळ मिळेल.
-वसंत पाटील,
कुस्ती प्रशिक्षक,
मोतीबाग तालीम, कोल्हापूर.