प्राध्यापकांचे तोंडाला काळ्या फिती लावून मूक - कोल्हापूर आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:59 PM2018-10-03T13:59:55+5:302018-10-03T14:04:25+5:30
उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलनाची दखल न घेता मौन धारण केले आहे.
कोल्हापूर : उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलनाची दखल न घेता मौन धारण केले आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन सुटावे यासाठी मंगळवारी गांधीजयंतीदिनी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) तर्फे मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ तोंडाला कापडाच्या काळ्या पट्ट्या लावून मूक धरणे आंदोलन करण्यात आले.
रिक्त जागा भरण्यात याव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, विद्यापीठातील शासननियुक्त नामनिर्देशन कमी करावे, प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे थकीत वेतन अदा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्राध्यापकांचे ‘एम्फुक्टो’ या राज्यव्यापी संस्थेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने या आंदोलनात सहभाग घेतला असून, गेल्या आठ दिवसांत विविध प्रकारे हे आंदोलन केले जात आहे.
मंगळवारी महात्मा गांधी जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे मौन सुटावे, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सरकारने मौन सोडून बोलते व्हावे, असे आवाहन आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी सरकारला केले. यावेळी मौन आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते प्रा. सुधाकर मानकर, डॉ. सुभाष जाधव, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. अरुण शिंदे, डॉ. अरुण पाटील, प्रा. संतोष जेठीथोर, प्रा. आर. जी. कोरबू, प्रा. प्रकाश कुंभार यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
यांनी दिला पाठिंबा
आंदोलनस्थळी आमदार चंद्रदीप नरके यांनी आंदोलनास भेट देऊन मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे नेते सुधाकर सावंत, प्रभाकर आरडे, ‘आयटक’चे बी. एल. बरगे, माध्यमिक शिक्षक संघ व लोकशाही आघाडीचे राजेश वरक, आदींनी भेटून आंदोलनास पाठिंबा दिला.