पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जिल्ह्यात निषेध

By admin | Published: February 16, 2015 11:14 PM2015-02-16T23:14:59+5:302015-02-16T23:19:58+5:30

सांगलीत संतप्त प्रतिक्रिया : पुरोगामी संघटनेची सभा; मिरजेत विविध संघटनांकडून मोर्चा

Prohibition of attack on Pansare | पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जिल्ह्यात निषेध

पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जिल्ह्यात निषेध

Next

सांगली : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यात विविध संघटनांनी सभा, मोर्चा व आंदोलन केले. सांगलीमध्ये विविध पुरोगामी संघटनांकडून स्टेशन चौकात निषेध सभा घेण्यात आली. मिरजेमध्ये पुरोगामी संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. कुंडलमध्येही निषेध सभा घेण्यात आली. हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निषेध सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांंना निवेदन देण्यात आले. यापुढे असे हल्ले सहन न करण्याचाही इशारा देण्यात आला.
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर आज (सोमवार) सकाळी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुरोगामी संघटनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी हल्ले करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, प्रा. सुभाष दगडे, अ‍ॅड. के. डी. शिंदे, डॉ. संजय पाटील, प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, डॉ. प्रदीप पाटील, ज्योती अदाटे, शंकर पुजारी, सुमन पुजारी, अ‍ॅड. अमित शिंदे, उमेश देशमुख आदी सहभागी झाले होते.
यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले की, पानसरे यांच्यावरील हल्ला हा भ्याड असून, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ मोडीत काढण्याचा हा प्रकार आहे. यापुढे असले हल्ले हाणून पाडण्यासाठी पुरोगामी संघटनेने एकजूट दाखवली पाहिजे. पुरोगामी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. यापुढे अशा हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी निषेध केला आहे. हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मिरज : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मिरजेत विविध पक्ष, संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. राष्ट्र सेवा दलाने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.
पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्र सेवा दलातर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी हेमंत निकम यांना निवेदन देण्यात आले. अ‍ॅड. चिमण लोकूर, सदाशिव मगदूम, विजय मगदूम, जैलाब शेख, चंद्रकांत आंबी, विलास देसाई, अमृतराव सूर्यवंशी, लक्ष्मण शिंदे, केशव नकाते यांच्यासह पुरोगामी कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होते. कॉ पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे पुरोगामी चळवळ संपविण्याचा जातीयवाद्यांचा डाव आहे. हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी शिवराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखोरांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन करणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
कुंडल : डाव्या आघाडीचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर कोल्हापुरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा कुुंडल (ता. पलूस) येथे आज (सोमवार) निषेध करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गावातून फेरी काढण्यात आली. राज्यात पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींना राज्य सरकारने रोखण्याची हिंमत दाखवावी, दोषींना पकडून कठोर शासन करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
फेरीमध्ये शरद लाड, किरण लाड, उपसरपंच विठ्ठल बंडगर, कॉ. शहाजी पवार, जगन्नाथ आवटे व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

शंभर पोलीस रवाना
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास व बंदोबस्त करण्यासाठी सांगलीतून अधिकारी व कर्मचारी असा शंभरजणांचा फौजफाटा आज, सोमवारी दुपारी कोल्हापूरला रवाना झाला आहे. शहरासह जिल्ह्यात दिवसभर नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात होती. आज दुपारपर्यंत नाकाबंदी करण्यात आली. मात्र या नाकाबंदीमध्ये काहीही आढळले नाही.

Web Title: Prohibition of attack on Pansare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.