‘एव्हीएच’ प्रकल्प परिसरात आंदोलकांना प्रवेशास बंदी
By admin | Published: March 23, 2015 12:05 AM2015-03-23T00:05:53+5:302015-03-23T00:43:47+5:30
आंदोलकांना नोटिसा : न्यायालयात कंपनीचा मनाई दावा दाखल
चंदगड : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ‘एव्हीएच’ विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात ‘एव्हीएच’ कंपनीमार्फत चंदगड न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, या दाव्याच्या नोटिसा आंदोलनकर्त्यांना न्यायालयामार्फत बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.‘एव्हीएच’विरोधात ७ मार्चला आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ व मोडतोड करून मोठे नुकसान केले. यापैकी १४ आंदोलकांविरोधात दावा दाखल झाला आहे. या आंदोलकांनी धरणे आंदोलन, रास्ता रोको अशा स्वरूपाची आंदोलने करू नयेत, तसेच या आंदोलकांना कंपनीच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर प्रवेश करण्यास मनाई मिळावी, असा दावा दाखल केला आहे.यासंदर्भात प्रा. एन. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलकांवर खोटे दावे दाखल करण्यापेक्षा कंपनीने लोकांच्या आरोग्य व पर्यावरणाचा विचारा करावा व प्रकल्प योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा किंवा त्याठिकाणी शेतीवर आधारित पर्यावरणमुक्त प्रकल्प सुरू करावा, यासाठी आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले. डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, लोकशाहीतील संविधानाच्या आधारे आपल्या न्याय व हक्कासाठी जनआंदोलन, रास्ता रोको, मोर्चे काढणे हे मूलभूत अधिकार आहेत. हा दावा न्यायालयात चालविण्यास पात्र नाही. कंपनीचे हे दबावतंत्र असून, जनआंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे.डॉ. बाभूळकर, प्रा. एन. एस. पाटील, अॅड. संतोष मळवीकर, दयानंद देवण, गणेश फाटक, प्रशांत चौगुले, विष्णू गावडे, विश्वनाथ ओऊळकर, पांडुरंग बेनके, विलास पाटील, तानाजी गडकरी, वसंत निट्टूरकर, बसवंत निट्टूरकर व श्रीशैल नागराळ, आदी १४ जणांना या नोटिसा चंदगड न्यायालयामार्फत बजावण्याचे काम सुरू आहे.
कंपनीमार्फत आनंद कामोजी यांनी हा दावा दाखल केला असून, अॅड. ए. पी. देवण काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)