चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:41 AM2019-03-19T11:41:25+5:302019-03-19T11:43:01+5:30
कोल्हापूरच्या संचालकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चुकीच्या कारभारावरून सोमवारी सभासदांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व खजानिस संजय ठुबे यांचा निषेध केला. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासाठी जागा घेणे, कार्यवाह रणजित जाधव यांच्या राजीनाम्याला मंजुरी व सभासदांविषयी वापरण्यात आलेले ‘अपशब्द’ यावरून हा विषय तापला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या संचालकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चुकीच्या कारभारावरून सोमवारी सभासदांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व खजानिस संजय ठुबे यांचा निषेध केला. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासाठी जागा घेणे, कार्यवाह रणजित जाधव यांच्या राजीनाम्याला मंजुरी व सभासदांविषयी वापरण्यात आलेले ‘अपशब्द’ यावरून हा विषय तापला आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात चित्रपट महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, संचालक शरद चव्हाण, सतीश बिडकर चारही कोल्हापूरचे संचालक उपस्थित नसताना कार्यवाह रणजित जाधव यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
यावेळी संचालकांविषयी अपशब्दही वापरण्यात आले. महामंडळाच्या कार्यालयासाठी कोल्हापुरातजागा खरेदीचा निर्णय झाला होता. मात्र, त्यापूर्वीच पुण्यातील जागा खरेदीवर चर्चा होऊन त्याला प्र्राधान्य दिले गेले. कोल्हापुरात हे महामंडळाचे मुख्य कार्यालय असल्याने येथील जागेचा निर्णय झाला पाहिजे, अशी येथील सभासदांची मागणी आहे.
वरील विषयांवरून सोमवारी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सभासदांची बैठक झाली.
महामंडळाच्या सभेत अध्यक्षांनी रणजित जाधव यांच्या राजीनाम्याचा प्रश्न संपल्याचे जाहीर केल्यानंतरही हा राजीनामा का मंजूर करण्यात आला, कोल्हापूर व मुंबई हे मुख्य केंद्र असताना पुण्यात जागा खरेदीचा अट्टाहास का, सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग न दाखविता पुण्याला का पाठविले गेले, असे प्रश्न सभासदांनी उपस्थित केले तसेच अध्यक्षांच्या घटनाबाह्य कामकाजाचा व संचालकांविषयी ‘अपशब्द’ वापरल्याबद्दल संजय ठूबे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी चार दिवसांत कोल्हापूरला आल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले.
यावेळी हेमसुवर्णा मिरजकर, महेश पन्हाळकर, इम्तियाज बारगीर, अभिनेता आनंद काळे, सर्जेराव पाटील, रवी गावडे, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, रणजित जाधव, सहखजानिस शरद चव्हाण, अवधूत जोशी, अमर मोरे, मनोज मराठे, अजय खाडे, परशुराम गवळी यांच्यासह सभासद उपस्थित होते.