राजाराम महाविद्यालयात उधळलाविदेशी मद्याचा प्रमोशन कार्यक्रम

By admin | Published: November 23, 2014 12:51 AM2014-11-23T00:51:39+5:302014-11-23T00:51:39+5:30

प्राचार्यासह आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

Prohibition of foreign liquor promotion program at Rajaram College | राजाराम महाविद्यालयात उधळलाविदेशी मद्याचा प्रमोशन कार्यक्रम

राजाराम महाविद्यालयात उधळलाविदेशी मद्याचा प्रमोशन कार्यक्रम

Next

 कोल्हापूर : शासकीय राजाराम कॉलेजवर मद्यनिर्मिती करणाऱ्या आॅफिसर्स चॉईस कंपनीच्यावतीने आज, शनिवारी रात्री आयोजित केलेला विदेशी मद्याचा प्रमोशन कार्यक्रम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावला. अशा कार्यक्रमास परवानगी देणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रायोजकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडे केली. शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे हिंदू एकता कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, राजाराम कॉलेजवर मद्यनिर्मिती करणाऱ्या आॅफिसर्स चॉईस कंपनीच्या वतीने शनिवारी रात्री आठच्या सुमारास महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक हॉलमध्ये ड्रिंकिंग वॉटर प्रमोशनचा कार्यक्रम आयोजित केला होता. हॉलच्या बाहेर लावलेल्या पोस्टरवर ‘चार कूपन्सवर एक मद्य फ्री’ असा मजकूर लिहिला होता. याची चाहूल हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना लागली. कार्यकर्ते उदय लाड, जयदीप शेळके, समीर पाच्छापुरे, आदी महाविद्यालयात गेले आणि त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. नंतर त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांना शासकीय महाविद्यालयात मद्याच्या प्रमोशनाचा कार्यक्रम होणे उचित नाही. तुम्ही परवानगी दिलीच कशी? असा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आॅर्केस्ट्राच्या संयोजकांना साहित्य घेऊन हॉलमधून बाहेर काढले आणि हॉलला कुलूप लावले. संतप्त कार्यकर्त्यांनी प्राचार्य हेळवी व प्रायोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राजारामपुरी पोलिसांकडे केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याप्रकरणी चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of foreign liquor promotion program at Rajaram College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.