सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा‘ आयटक’चा मेळाव्यात निषेध
By admin | Published: May 29, 2017 04:48 PM2017-05-29T16:48:35+5:302017-05-29T16:48:35+5:30
जूनमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चानिर्णय
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९: देशातील कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी कामगारांच्यात एकजुटीने करुन सरकारशी मुकाबला करण्यासाठी लढा उभारण्यात येणार असून त्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतमजूर व भूमीहिन शेतकऱ्यांना वयाच्या ५५ वर्षानंतर कायद्याची मंजूर झालेली पेन्शन योजना लागू करावी, सरकारचे कामगार विरोधी धोरण मोडीत काढून कामगार कायद्यांची अंमलबजावणी तीव्रतेने करावी, असंघटीत कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे आदी मागण्यासाठी सोमवारी दुपारी येथील मुस्लीम बोर्डीगच्या सभागृहात आयटक कामगार केंद्राच्यावतीने कामगार मेळावा झाला.
आयटकच सहसचीव दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कामगार नेत्यांनी सरकारच्या विवीध धोरणाचा समाचार घेतला. संघटनेचे अध्यक्ष एस.बी. पाटील, मेघा पानसरे आदी प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात दिलीप पवार म्हणाले, सद्याच्या अर्थनितीच्या भस्मासुरामुळे संपूर्ण समाजजीवन उध्दवस्त होत असल्याची टिका केली. ते म्हणाले, कामगार कायद्यांची पायमल्ली करुन हे सरकार कंपन्यामध्ये कंत्राटी कायदा आणून अनेक कामगारांना देशोधडीला लावत आहे. युवकांना नोकरीची प्रलोभने दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारचे धोरण हे कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा या सरकारविरोधात कामगार, शेतमजूर असंघटीत कामगारांनी एकसंघ राहून लढा उभारला पाहिजे. त्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेघा पानसरे म्हणाल्या, देशातील भाजपाचे सरकार हे गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन श्रीमंतांची काळजी घेत आहे. नोकरदार महिला सुरक्षीत नाहीत. असंघटीत महिला कामगारांनी एकसंघ राहून लढा उभा केला पाहिजे. जात, धर्माच्या नावावर संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे एकसंघ राहून सर्वांनी लढ्यातून ताकद दाखवू.
रघुनाथ कांबळे म्हणाले, कामगारानां पेन्शन नाही, देशात दंगली घडवून राजकारण करण्याचे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे या सरकारच्या धोरणाविरोधात रणशिंग फूंकूया. यावेळी अध्यक्ष एस. बी. पाटील, रघुनाथ देशींगे, विक्रम कदम, बाळासाहेब पोवार, आशा कुकडे, बाबा यादव आदींची भाषणे झाली.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन महादेव पडवळे व बळवंत पोवार यांनी केले. यावेळी सुशिला यादव, रेखा कांबळे, उमेश पानसरे, जमीर शेख, दीपक निंबाळकर, वाय. के. कांबळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात, घरेलू कामगार, शेतमजूर महिला लाल साड्या नेसून आपल्या लहान मुलांसहीत मोठ्या संख्येने उपस्थित राहील्या होत्या.