कोल्हापूरात गौरी लंकेश हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:06 PM2017-09-06T19:06:09+5:302017-09-06T19:09:07+5:30
कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश अमर रहे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांचा निषेध असो, हत्येला जबाबदार सरकारचा निषेध असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद अशा घोषणा देत बुधवारी शहिद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे बिंदू चौकात निषेध सभा घेण्यात आली. या खूनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खूनाशी काही संबंध आहे का याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याविरोधात बुधवारी संघर्ष समितीसह डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात निदर्शने करत निषेध सभा घेतली. दरम्यान, शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पत्रकार गौरी लंकेश यांना बुधवारी आदराजंली वाहिली. विविध घोषणा देत या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला.
विद्यापीठातील बॅ. खर्डेकर ग्रंथालयासमोर विद्यार्थी-विद्यार्थीनीं जमल्या. याठिकाणी उमा पानसरे आणि गिरीश फोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदराजंली सभा झाली. यात उमा पानसरे म्हणाल्या, देशात धार्मिक आतंकवाद थैमान घालत असताना सरकार बघ्याची भूमिका घेवून एकप्रकारे खुन्यांचा बचाव करत आहे. सरकारने या खुन्यांवर कारवाई न केल्यास आमचा संयमाचा बांध सुटेल. गिरीश फोंडे म्हणाले, पुणे-कोल्हापूर-धारवाड-बेंगलोर असा भगवा आतंक भौगोलिकतेची निवड करुन पसरविला जात आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध हा ‘इंडिया अगेन्स्ट फॅसिझम’ या मोहिमे अंतर्गत करण्यात येत आहे.
या सभेत सुनिता अमृतसागर यांनी पत्रकार गौरी लंकेश यांचा जीवनपट सांगितला. यानंतर ‘गौरी लंकेश अमर रहे’, ‘लडेंगे-जितेंगे’, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य झिंदाबाद’ अशा उपस्थितांनी घोषणा दिल्या. यावेळी प्रशांत आंबी, सलिल कलमे, धीरज कठारे, आरती रेडेकर, माधुरी राऊत, कृष्णा पानसे, अक्षय घोरपडे, प्रतिक कळंबटे, स्वप्निल पोवार, गणेश गडदे, अमोल रायकर, सिद्धी तांदळे, मुकुंद कदम, सुधाकर बागल, सुप्रिया सुतार, विक्रम मोरे, अश्विनी वाघमारे, स्वप्नाली निकम, सरदार जाधव, नितीन कांबळे, अक्षय कांबळे, प्रसाद पाटील, प्रविण लाड, सचिन बनसोडे, आदी उपस्थित होते.