कोल्हापूर जिल्ह्यात १ ते १३ मेपर्यंत बंदी आदेश लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:19 PM2023-04-28T12:19:08+5:302023-04-28T12:19:26+5:30
मागील काही महिन्यांपासून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, त्या पार्श्वभूमीवर १ ते १३ मे दरम्यान जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिले.
शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन धर्मात तेढ व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच पुढील काळात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरूस होणार असल्याने आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटसमुळे अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू राहील.
याकाळात शारीरिक इजा होईल असे शस्त्र, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, उपकरणे हाताळण्यावर बंदी असेल. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे यावर बंदी असेल. पण हा आदेश कर्तव्यावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी, जातिधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू नसेल.