बाजार समिती सभापती राजीनामा लांबणीवर -सोमवारनंतरच प्रक्रिया:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:11 AM2018-11-23T11:11:06+5:302018-11-23T11:13:08+5:30
बाजार समितीत आधी कोण राजीनामा देणार, यावरून सभापती, उपसभापती यांच्यात गुरुवारी दिवसभर मतैक्य न झाल्याने एकाचाही राजीनामा होऊ शकला नाही. आता हे प्रकरण नेत्यांच्या कानांवर घातले जाणार आहे
कोल्हापूर : बाजार समितीत आधी कोण राजीनामा देणार, यावरून सभापती, उपसभापती यांच्यात गुरुवारी दिवसभर मतैक्य न झाल्याने एकाचाही राजीनामा होऊ शकला नाही. आता हे प्रकरण नेत्यांच्या कानांवर घातले जाणार आहे. दोन दिवसांत यावर चर्चा होऊन सोमवार (दि. २६)नंतर राजीनामा देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समिती सत्तास्थापनेच्या ठरलेल्या सूत्रानुसार राष्ट्रवादीचे कृष्णात पाटील यांची सभापतिपदाची, तर शेकापचे अमित कांबळे यांची उपसभापतिपदाची मुदत संपली आहे. बुधवारी (दि. २१) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘या दोघांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामे द्यावेत,’ असा निर्णय झाला होता. स्वत: आमदार हसन मुश्रीफ यांनीही संचालक मंडळाच्या बैठकीनंतर राजीनामे द्यावेत, असे आदेश दिले होेते.
पण ठरल्याप्रमाणे गुरुवारी राजीनामे होऊ शकले नाहीत. १० ते १२ संचालकांची दुपारी बाजार समितीत बैठक झाली. यात दोघांनी राजीनामे द्यावेत असे सांगितले; पण सभापती कृष्णात पाटील यांनी आधी राजीनामा द्यावा, असे उपसभापती अमित कांबळे यांचे म्हणणे आहे, तर उपसभापतींनी आधी राजीनामा द्यावा, असे सभापतींचे म्हणणे आहे. यावरून दोघांमध्ये दिवसभर मतैक्य होऊ शकले नाही.
संचालकांनी उपसभापतींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण सभापतींचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे गेल्यानंतर नवीन सभापती निवडीपर्यंत उपसभापतींकडे प्रभारी कार्यभार असतो. असा पायंडा यापूर्वीच्या उपसभापतींनी पाडून ठेवल्यामुुळे याची पुनरावृत्ती होईल, या शक्यतेने राजीनामे देण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदा कुणी राजीनामा द्यायचा यावरून सुरू असलेला हा वाद आता नेत्यांच्या कोर्टात गेला आहे. संचालकांनी नेत्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देण्याचे ठरविले आहे.