कागल पालिका सभेत राज्य शासनाचा निषेध

By Admin | Published: January 31, 2017 11:19 PM2017-01-31T23:19:47+5:302017-01-31T23:19:47+5:30

‘म्हाडा’ला दिलेली जमीनप्रकरण : भाजप नगरसेवकांचा ठरावाला विरोध

Prohibition of State Government in Kagal Palika Sabha | कागल पालिका सभेत राज्य शासनाचा निषेध

कागल पालिका सभेत राज्य शासनाचा निषेध

googlenewsNext

कागल : नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेला न जुमानता तसेच ज्या जागेवर शाळा इमारत, दसरा मैदान अशी आरक्षणे आहेत. माजी सैनिक आणि मागासवर्गीयांच्या गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव आहेत, अशा नऊ एकर जागेवर ‘म्हाडा’चे नाव अवघ्या तीन दिवसांत लावणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा कागल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेध करीत या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा ठराव बहुमताने करण्यात आला. तर या ठरावाला विरोध करीत भाजप नगरसेवकांनी ‘म्हाडाची’ बाजू उचलून धरली.
नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, मुख्याधिकारी टीना गवळी प्रमुख उपस्थित होत्या.
विषय क्र. ९ वरील गट नं. ४२५ ही जमीन म्हाडाकडे वर्ग झाल्याच्या विषयावर पक्षप्रतोद प्रवीण काळबर म्हणाले, म्हाडाचा कागलचा लोकांना फायदा नाही. संपूर्ण राज्यातून घरमागणी होणार. जर केवळ कागलसाठी असेल तर आम्ही यात राजकारण आणणार नाही. पण, माजी सैनिक, मागासवर्गीयांच्या घराचे स्वप्न पायदळी तुडविणाऱ्या या प्रस्तावाला आम्ही पूर्णपणे विरोध करू. त्यासाठी न्यायालयीन तसेच रस्त्यावरचीही लढाई करू. गटनेत्या दीपाली भुरले यांनी लोकांना कमी दरात घरे मिळणार असल्याने म्हाडाला कोणी विरोध करू नये, असे आवाहन केले. तर सुरेश पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या ठरावाला विरोध केला. विषय क्र. १० प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याच्या विषयावर प्रवीण कदम यांनी या योजनेचा लाभ देताना लाभार्थ्यांमध्ये पक्षपात करू नये, असे सांगितले. तर उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी गरजू व पात्र लाभार्थ्यांनाच हा लाभ देण्याचे धोरण आहे, असे स्पष्ट केले. सुरुवातीला नगराध्यक्षांना सभागृहाचे कामकाज चालविण्याबद्दलसक्त सूचना दिल्या. अपंगबांधवांना रोख रक्कम स्वरूपात लाभ देणे, मराठा आरक्षणास पाठिंबा, आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत राजाराम निंबाळकर, नूतन गाडेकर, माधवी मोरबाळे, बाबासो नाईक, आनंदा पसारे, लक्ष्मीबाई सावंत, आनंदी मोकाशी, विवेक लोटे, जयश्री शेवडे, अलका मर्दाने, शोभा लाड यांनीही भाग घेतला.


अभिनंदन ठराव : मुख्याधिकाऱ्यांचे कौतुकया सभेत पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरदचंद्र पवार यांचा, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न करून न्यायालयीन लढाई जिंकल्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा, तर घरकुल तपासणी करून कारवाई केल्याबद्दल मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत करण्यात आला.
सत्ताधारी आणि विरोधी गटानेही मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Web Title: Prohibition of State Government in Kagal Palika Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.