प्रकल्पग्रस्तांनी हातकणंगलेत शोधून काढली ११ हेक्टर जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:50+5:302021-04-12T04:21:50+5:30
श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्त गेल्या ४२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून ...
श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्त गेल्या ४२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले आहे. प्रकल्पग्रस्तांना हक्काच्या जमिनी द्या, अशी मागणी आहे, पण दरवेळी जमीन उपलब्ध नसल्याची कारणे देऊन चालढकल होत असल्याने अखेर प्रकल्पग्रस्तांनी स्वत:च जमिनी शोधण्यास सुरुवात केली. यासंदर्भात पाच एप्रिलला इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली.
यावेळी १५ एप्रिलच्या आधी अशा लपलेल्या जमिनीचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे ठरले. यासाठी त्या त्या मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या सर्कलमधील माहिती श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांसोबत बसून जमिनीचा कॅम्प घेऊन घ्यावी, असे ठरले होते. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील कसबा वडगाव सर्कलमधील जमीन शोधली असता ११ हेक्टर २५ आर जमीन सापडली आहे.
चौकट ०१
घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव, अंबपमध्येही शोधमोहीम
कुंभोज सर्कलमधील आणि शिरोळ तालुक्यातील लपलेली जमीन शोधण्याचा कार्यक्रम आज, सोमवारपासून घेतला जाणार आहे. घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव व अंबप या गावांतील जमिनी शोधल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात येत्या दोन दिवसांत होणार आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे मारुती पाटील यांनी सांगितली.
चौकट ०२
ठिय्या आंदोलन सुरूच राहणार
शासनाने कोरोना पार्शवभूमीवर लॉकडाऊन कडक केला असला तरी जाहीर केलेले नियम व जमावबंदी आदेशानुसार चार माणसे ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन सुरूच राहणार असून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.