प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा महाविद्यालयांमध्ये होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:25+5:302021-03-08T04:24:25+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांचा प्रारंभ दि. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. एका दिवसातील चार विविध सत्रांमध्ये परीक्षा होतील. एम.बी.ए., एम.कॉम., अशा ज्या अभ्यासक्रमांचे प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा आहेत, या परीक्षा महाविद्यालय पातळीवर होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाने स्थापन केलेल्या गुळवणी समितीच्या शिफारसीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शनिवारी हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए., बीसीए., बीएसडब्ल्यू., बी.व्होक., बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईनिंग, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, डिझाईन, ड्रेस मेकिंग अँड फॅशन-को ऑर्डिनेशन, अशा विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३२४ परीक्षा होणार आहेत. दूरशिक्षण पध्दतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा संबंधित अभ्यास केंद्र असलेल्या महाविद्यालयांवर होईल. जे विद्यार्थी संयुक्त परीक्षेला (वेगवेगळ्या भागांत एकत्रित किंवा वेगवेगळ्या सत्रांत एकत्रित) बसणार आहेत. त्यांचे निकाल नियमित विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. या सत्रातील पदवी प्रथमवर्ष (प्रथम, दि्वतीय सत्र) आणि पदव्युत्तर प्रथम वर्ष (प्रथम) परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली आहे.
पॉईंटर
अशी होणार परीक्षा...
१) एक तासाची ५० गुणांची बहुपर्यायी (एमसीक्यू)
२) ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरूप
३) २५ प्रश्न असून प्रत्येकी दोन गुण असणार
४) एका दिवसात चार सत्र असतील
सकाळी १०.३० ते ११.३०, दुपारी १२.३० ते १.३०
दुपारी २.३० ते ३.३०, दुपारी ४.३० ते सायंकाळी ५.३०
प्रतिक्रिया
बी.एस्सी., एम.एस्सी अशा वार्षिक अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिके आता होणार नाहीत. मात्र, एमबीए, एम.कॉम, अशा ज्या अभ्यासक्रमांना प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षा आहेत, त्या लेखी परीक्षा सुरू होण्यापू्र्वी महाविद्यालयांमध्ये होतील.
- गजानन पळसे,
प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.