निधी नसल्याने प्रकल्प रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:11+5:302021-03-22T04:23:11+5:30

संजय पारकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : २०००मध्ये हक्क व सवलतीबाबत पाहणी झाली. मात्र महसूल व वन्यजीव विभाग यांच्यातील ...

The project stalled due to lack of funds | निधी नसल्याने प्रकल्प रेंगाळला

निधी नसल्याने प्रकल्प रेंगाळला

Next

संजय पारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : २०००मध्ये हक्क व सवलतीबाबत पाहणी झाली. मात्र महसूल व वन्यजीव विभाग यांच्यातील टोलवाटोलवीत अनेक वर्षे गेली. त्यामुळे याचा सविस्तर अहवाल तयार होण्यास २०१० साल उजाडले. १८ फेब्रुवारी २०१० रोजी वन्यजीव विभागाने शासनाला पाठवलेल्या अहवालनुसार स्थलांतरित होणार्‍या लोकांना घरांसाठी जमीन, त्यांचे बांधकाम, ३० टक्के दिलासा रक्कम, प्रलंबित काळातील व्याज,स्थलांतर,नागरी वसाहत, पर्यायी शेतजमीन,आस्थापना यासाठी २१४.८२ कोटी व दूधगंगा धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या धरणकाठावरील शिल्लक ५२९ हेक्टर जमिनीसाठी २.१५ कोटी असा एकूण २१६.९७ कोटी निधी मागणी केली होती.

मात्र गेल्या दहा वर्षांत यासाठी १० टक्केही निधी उपलब्ध झालेला नाही.

या दरम्यान १० ऑक्टोबर २०१३ पासून राज्य शासनाने स्वेच्छा पुनर्वसन योजना सुरू केली. यामध्ये बाधित कुटुंबाला जमीन व घर न देता रोख पॅकेज स्वरुपात एकररकमी दहा लाख रुपये देण्याची तरतूद आहे. यात १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलगा व मुलीला स्वतंत्र कुटुंब समजून त्यांना हा जादा लाभ दिला जातो. या योजनेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सर्वप्रथम एजिवडे या गावाने हा पर्याय स्वीकारला. येथील ११४ कुटुंबे यात पात्र ठरली. त्यांनी वन्यजीव विभागाला दानपत्रे करून दिली. पैकी ५४ लोकांना वैयक्तिक ५ लाख व संयुक्त खात्यावर ५ लाख अशी रक्कम २०१४ मध्ये जमा केली. बाकी लोकांना पैसे मिळायला पुढील दोन वर्षे लागली. २०१५मध्ये या योजनेत सुधारणा करून घरांचे मूल्यांकन करून ही रक्कम द्यायची तरतूद झाली. २०१८मध्ये जमिनीची रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली. पॅकेज रक्कम मिळण्याला विलंब झाल्याने या लोकांनी सुधारणा झाल्यानुसार रक्कम मागणी केल्याने ही प्रक्रिया किचकट बनली.

ठळक- एजिवडे येथील घरे,जमिनी या पोटी १० कोटी ५० लाख रुपये द्यावे लागतात. वारंवार मागणी करूनही याची पूर्तता होत नसल्याने गेल्या २६ जानेवारी रोजी या लोकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते, त्यावेळी ३१ मार्चपर्यंत हे पैसे देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही ते मिळालेले नाहीत. पुनर्वसन होणार अशी आस लागलेल्यापैकी जुन्या पिढीतील अनेकांनी हे जग सोडले आहे. आता दुसरी पिढी सक्रिय झाली आहे. त्याना तरी पुनर्वसन झालेले पहायला मिळणार काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रतिक्रिया-

वन्यजीव हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारित येतो. यासाठी मिळणारा सर्व निधी केंद्राकडून मिळतो. प्रलंबित निधीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मार्चपर्यंत निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनतरी तो मिळालेला नाही. यामुळे पुनर्वसन प्रक्रियेला विलंब होत आहे.

अनिल जेरे, सहायक वनसंरक्षक राधानगरी वन्यजीव

Web Title: The project stalled due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.