प्रकल्पग्रस्तांनी उचंगी धरणाचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:34+5:302021-03-04T04:44:34+5:30
आजरा : संकलन, दुरुस्तीसह धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत उचंगी धरणाचे काम करू न देण्याचा निर्णय धरणस्थळावर ...
आजरा : संकलन, दुरुस्तीसह धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत उचंगी धरणाचे काम करू न देण्याचा निर्णय धरणस्थळावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला व गेले चार महिने सुरू असलेले धरणाच्या सांडव्याचे काम बंद करण्यात आले.
धरणग्रस्तांच्या संकलन दुरुस्तीबाबत झालेल्या चर्चेप्रमाणे अंमलबजावणी नाही, पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत महसूल विभाग सहकार्य करीत नाही. जिल्ह्याला झालेल्या बैठकीत धरणग्रस्तांवर अरेरावी केली जाते. त्यामुळे यापुढे धरणस्थळावर बैठका घेणे, कायद्यानुसार धरणग्रस्तांना मान्यता देणे, धरणाच्या दोन मीटरने वाढविलेल्या उंचीप्रमाणे जादाचे बुडीत क्षेत्र विचारात घेऊन नव्याने संकलन रजिस्टर निश्चित करणे या मुद्द्यांवर धरणस्थळावरील बैठकीत चर्चा झाली.
आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम बळाचा वापर करून सुरू केले आहे. त्याप्रमाणे उचंगी धरणग्रस्तांवर प्रसंग ओढवू नये. उचंगीच्या सांडव्याच्या कामाला चार महिन्यांपासून सहकार्य केल्यामुळे काम अंतिम टप्प्यात आहे. पण, शासन पातळीवरून सहकार्य नाही. त्यामुळे सांडव्यासह धरणाचे काम मंगळवारी धरणग्रस्तांनी बंद पाडले.
यावेळी कृष्णा खोरेचे कार्यकारी अभियंता अनिल नाईक यांना निवेदन देण्यात आले.
संजय तर्डेकर, दत्ता बापट, संजय भडांगे, सुरेश पाटील, रघुनाथ धडाम, मारुती चव्हाण, कृष्णा गुडूळकर, पांडुरंग धनुकटेकर यांसह मोठ्या संख्येने धरणग्रस्त उपस्थित होते.
- उचंगीचे काम बेमुदत राहणार बंद
धरणग्रस्तांनी शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून सांडव्याच्या कामाला परवानगी दिली. अधिकाऱ्यांनी बैठकीत सकारात्मक चर्चा केली. पण, अंमलबजावणी नाही. त्यामुळे पुनर्वसन आधी; मगच धरणाचे काम, अशी भूमिका घेत यापुढे धरणाचे काम बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.
- सर्फनाला धरणाचे काम ११ मार्चपासून बंद करणार
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शेळपला गावठाण वाढ, लाभक्षेत्रात मिळालेल्या जमिनीचे सपाटीकरण, संकलन रजिस्टरमधील त्रुटी दूर करणे, धरणग्रस्तांना मिळालेल्या जमिनी कसण्यात होणारे अडथळे यांसह अन्य मागण्यांबाबत ११ मार्चपासून धरणाचे काम बंद करणार असल्याचे पत्र धरणग्रस्त संघटनेचे नेते सुरेश मिटके यांच्यासह धरणग्रस्तांनी कार्यकारी अभियंता, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मंगळवारी दिले.
--
* फोटो ओळी : उचंगी धरणाचे काम बंद पाडण्यापूर्वी कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत बोलताना संजय तर्डेकर. सोबत अन्य धरणग्रस्त.
क्रमांक : ०२०३२०२१-गड-०८