टाकवडे वेस येथील प्रकल्प : विरोध मोडून ‘एसटीपी’ जागेचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:05 AM2018-11-15T00:05:15+5:302018-11-15T00:05:29+5:30
इचलकरंजी : टाकवडे वेस येथील भुयारी गटार सांडपाणी जलशुद्धिकरण प्रकल्पाची जागा (एसटीपी) ताब्यात घेण्यासाठी बुधवारी झालेला अल्प विरोध पोलिसांनी ...
इचलकरंजी : टाकवडे वेस येथील भुयारी गटार सांडपाणी जलशुद्धिकरण प्रकल्पाची जागा (एसटीपी) ताब्यात घेण्यासाठी बुधवारी झालेला अल्प विरोध पोलिसांनी मोडून काढला. नगरपालिकेने जागा ताब्यात घेऊन त्या भोवती तातडीने तारेचे कुंपण घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, संयुक्त गावभाग एसटीपीविरोधी कृती समितीने प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली. सुमारे सहा तास चाललेले महिला-पुरुषांचे ठिय्या आंदोलन सायंकाळी स्थगित करण्यात आले.
येथील वाढीव वसाहती व कबनूर-शहापूर परिसरासाठी नवीन भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत जमिनीखालून नळ टाकण्याचे काम ७१ टक्के पूर्ण झाले असून, ‘एसटीपी’ प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, एसटीपीविरोधी कृती समितीने टाकवडे वेस येथे प्रकल्प नको, अशी भूमिका घेत जमिनीचा ताबा घेण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी नगरपालिकेने सुमारे ५00 पोलिसांचा फौजफाटा घेऊन जागेचा ताबा घेतला.
बुधवारी सकाळी दहा वाजता जागेचा ताबा घेण्यास जाण्यापूर्वी पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्यावतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी निश्चित करणारी बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी, अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदारीची जाणीव करून देताना आंदोलनकर्त्यांना अपशब्द न वापरता त्यांचा विरोध निर्धारपूर्वक मोडून काढावयाचा असल्याचे सांगितले. तसेच बंदोबस्ताची आखणी केली.
टाकवडे वेस येथील नियोजित प्रकल्पाच्या जागेवर दीपक कांबळे, राजा कांबळे, रवी रजपुते, अविनाश कांबळे, एम. के. कांबळे, राजू आरगे, प्रकाश कांबळे, आदींच्या नेतृत्वाखाली महिला-पुरुष आंदोलकांनी सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी नगरपालिका व पोलीस यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी येताच आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. तेव्हा आंदोलनकर्त्यांच्यावतीने दीपक भोसले, राजा कांबळे, सयाजी चव्हाण, रवी रजपुते, आदींनी भूमिका मांडली, तर शासनाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे व नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी प्रशासनाची बाजू मांडली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी आमचे विरोधाचे आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्णय घेतला.
मक्तेदार प्रकल्प उभारणार का?
नागरिकांचा होणारा विरोध मोडून प्रकल्पाच्या जागेभोवती नगरपालिकेने तारेचे कुंपण उभारले. आता ही जागा भुयारी गटार योजनेच्या मक्तेदाराकडे प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येईल. मात्र, गेले सव्वा वर्ष गटार योजनेचे कोणतेही काम न करणाºया या मक्तेदाराकडून प्रकल्प उभारण्यास कितपत सहकार्य मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.