घरकुलमध्ये दलालांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:08+5:302021-08-28T04:27:08+5:30
कसबा बावडा : जुन्या तारखा घालून बांधकाम परवाने देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा, घरकुलमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाल्याने त्यांचा बंदोबस्त ...
कसबा बावडा :
जुन्या तारखा घालून बांधकाम परवाने देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा, घरकुलमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाल्याने त्यांचा बंदोबस्त करा, पोषण आहाराचा ठेकेदार बदला, अशा मागण्या पंचायत समिती सदस्यांनी केल्या. शुक्रवारी करवीर पंचायत समितीची मासिक सभा सहा महिन्यांनंतर ऑफलाईन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती मंगल पाटील होत्या. यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जुन्या तारखा घालून काही ग्रामसेवकांनी बांधकाम परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी प्रदीप झांबरे यांनी केली. घरकुल योजनेमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. एजंट लोकांकडून घरकुल योजना मंजुरीसाठी पैसे घेतात, अशा एजंटांवर पोलिसांत पंचायतीने तक्रार दाखल करावी, अशी मागणी सुनील पोवार यांनी केली. यावर गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी लाभार्थ्यांनी घरकुलचे अर्ज प्रथम ग्रामपंचायतीकडे द्यावेत. तिथून ते पंचायतीकडे येतील. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ते मंजूर केले जातात. त्यामुळे कोणीही एजंटांना पैसे देऊ नका, असे आवाहन केले. यावेळी रमेश चौगले, इंद्रजित पाटील, विजय भोसले, नेताजी पाटील, यशोदा पाटील, सरिता कटेजा, मोहन पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
कोण काय म्हणाले...
- शालेय पोषण आहाराची डाळ, चटणी खराब असूनही अधिकारी संबंधित ठेकेदारावर का कारवाई करत नाहीत - प्रदीप झांबरे, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पोवार
- खराब पोषण आहारामुळे शाळेची पटसंख्या घटू लागली- अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, सविता पाटील, शोभा राजमाने
- महापुरामुळे कोसळलेले महावितरणचे पोल, विद्युत जोडण्या त्वरित द्या - राजेंद्र सूर्यवंशी यांनी मागणी केली.
चौकट :
गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करा
पंचायतीची सभा तब्बल सहा महिन्यानंतर ऑफलाईन झाली. मात्र, विविध विभागातील अधिकाऱ्यांनी या सभेला दांडी मारल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सभेत एकमुखाने करण्यात आली.