समीर गायकवाडवरील आरोपनिश्चिती लांबणीवर
By admin | Published: October 25, 2016 11:57 PM2016-10-25T23:57:09+5:302016-10-26T00:06:26+5:30
पानसरे हत्या प्रकरण : तावडेच्या कोठडीच्या निर्णयावर आज सुनावणी
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी मंगळवारी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी होती. उच्च न्यायालयाने दोषारोप दाखल करण्यासाठी २७ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिल्याने ही सुनावणी ५ नोव्हेंबरला होईल, असे न्यायाधीश बिले यांनी स्पष्ट केले. आज, बुधवारी दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे. त्यावर सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
पानसरे हत्याप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्याविरोधात ‘एसआयटी’ने दोषारोप न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने उद्या, गुरुवारपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी गायकवाडच्या आरोपनिश्चितीवरील सुनावणी न्यायाधीश बिले यांनी पुढे ढकलली. उद्या उच्च न्यायालयात आरोपनिश्चितीवरील स्थगिती निर्णयावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच खटल्यातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज, बुधवारी संपत आहे. या सुनावणीसह आरोपीचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पोलिसांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्याच्या अंतिम निकालाची सुनावणी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या दालनात होत आहे. सुनावणीस अॅड. चंद्रकांत बुधले, अॅड. समीर पटवर्धन, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, आदी उपस्थित होते.
कारागृहात त्रास नाही
आरोपनिश्चितीच्या सुनावणीला समीर न्यायालयात हजर होता. मागील सुनावणीला त्याने तुरुंगाधिकारी चंद्रकांत आवळे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. तिची गांभीर्याने दखल घेत न्यायाधीश बिले यांनी कारागृह प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यासंबंधी काही त्रास आहे का, अशी विचारणा न्यायाधीश बिले यांनी समीरला केली असता, त्याने सध्या कारागृहात कोणत्याही प्रकारे त्रास नसल्याचे सांगितले.