अपात्र संचालकांवरील कारवाई लांबणीवर
By admin | Published: March 9, 2016 12:50 AM2016-03-09T00:50:45+5:302016-03-09T00:52:49+5:30
१५ मार्चला सुनावणी : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्हा बॅँक संचालकांचा समावेश
कोल्हापूर : नवीन वटहुकुमानुसार अपात्र ठरलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालकांवरील कारवाई लांबणीवर पडली आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्यासमोर आता १५ मार्चला सुनावणी होणार असून, या दिवशीच अपात्रतेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने बरखास्त संचालक मंडळाला पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, असा दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने वटहुकूम लागू केला आहे. या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा बॅँकेचे अकरा, सांगली जिल्हा बॅँकेचे सात, तर सातारा जिल्हा बॅँकेचे एक असे १९ संचालक अपात्र ठरले आहेत. याबाबत विभागीय सहनिबंधक दराडे यांनी संबंधितांना अपात्रतेची नोटीस लागू केली आहे. तोपर्यंत अपात्र संचालकांनी शासनाच्या वटहुकुमाविरोधातच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
याबाबतची सुनावणी आता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुरू आहे. सोमवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत सरकारने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने मंगळवारच्या सहनिबंधकांकडील सुनावणीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तिन्ही बॅँकांच्या १९ अपात्र संचालकांच्या वतीने अॅड. लुईस शहा यांनी मंगळवारी सहनिबंधकांसमोर बाजू मांडली. २१ मार्चला उच्च न्यायालयात वटहुकुमाबाबत सुनावणी असल्याने त्यानंतरच आपण सुनावणी घ्यावी, अशी विनंती अॅड. शहा यांनी केली; पण सहनिबंधक दराडे यांनी त्यास नकार देत १५ मार्चला याबाबत सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
अॅड. शहा यांच्यासमवेत बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, भैया माने, आर. के. पोवार, रणजित पाटील, आसिफ फरास उपस्थित होते.
सहनिबंधकांनी नैसर्गिक न्यायपद्धतीने अपात्र संचालकांना म्हणणे मांडण्याची तीन वेळा संधी दिली आहे.
त्यात रिझर्व्ह बॅँकेच्या कारवाईत बरखास्त संचालक आहेत का? ते पुन्हा संचालक मंडळात आहेत का? एवढेच तपासले गेल्याने यापेक्षा वेगळे म्हणणे सादर करण्याची गरजही भासणार नाही. त्यामुळे १५ मार्चला सहनिबंधक दराडे संबंधितांना अपात्र केल्याचे आदेश काढतील, अशी दाट शक्यता आहे.
सांगली जिल्हा बॅँक : आमदार अनिल बाबर, मोहनराव कदम, विलासराव शिंदे, महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, विलासराव पाटील, सिकंदर जमादार.
सातारा जिल्हा बॅँक : माजी खासदार लक्ष्मणतात्या पाटील.
यांच्यावर आहे कारवाईची टांगती तलवार
कोल्हापूर जिल्हा बॅँक : आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, अशोक चराटी, निवेदिता माने, पी. जी. शिंदे, नरसिंग पाटील, राजू आवळे.