जगण्याला भिडणाऱ्या ‘प्रॉमिथिअसची कविता’

By admin | Published: August 13, 2015 11:53 PM2015-08-13T23:53:56+5:302015-08-14T00:02:58+5:30

किशोर बेडकीहाळ : राजा शिरगुप्पे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन

'Prometheus poem' | जगण्याला भिडणाऱ्या ‘प्रॉमिथिअसची कविता’

जगण्याला भिडणाऱ्या ‘प्रॉमिथिअसची कविता’

Next

कोल्हापूर : राजा शिरगुप्पे हे विद्रोही चळवळीचे कार्यकर्ते आहेत; पण त्याहीआधी एक संवेदनशील कवी असल्याने त्यांच्या कविता जगण्याला भिडणाऱ्या आहेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले. शाहू स्मारक भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राजा शिरगुप्पे प्रॉमिथिअसची कविता’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कवी राजा शिरगुप्पे, प्राचार्य विश्वास सायनाकर, गुणवंत पाटील, धनाजी गुरव, कवितासंग्रहाच्या संपादिका सीमा मुसळे, मीना मंगळूरकर उपस्थित होत्या. यावेळी किशोर बेडकीहाळ म्हणाले, राजाभाऊंची कविता विशिष्ट एका अनुभवाशी जोडलेली नाही. म्हणूनच त्यात एकसुरीपणा नाही. विद्रोही कार्यकर्त्याच्या कवितेतून नेहमी विद्रोहच डोकावला पाहिजे असा नियम नाही. विद्रोही ही एक व्यक्तीही असते आणि आपल्या वाटेला आलेल्या अनुभवांची निर्मिती आणि आशय यांची सांगड घालत जगण्याचा संघर्ष ती मांडू शकते. राजा शिरगुप्पे कवितेतून हा संघर्ष मांडतात. मग, त्यात जातिधर्माचा भेद नगण्य असतो. यावेळी विश्वास सायनाकर म्हणाले, देव घडविणाऱ्या प्रॉमिथिअसनी आम्हाला पूजेचा अधिकार का नाही, यावरून बंड केले होते. त्याचप्रमाणे शिरगुप्पे यांच्या कविता बंडखोरी मांडतात. या कविता विद्रोही चळवळीला नेहमीच प्रेरणादायी राहतील. राजा शिरगुप्पे म्हणाले, विद्यार्थिदशेपासूनच मी चळवळीशी जोडला गेलेलो आहे. त्यामुळे बुद्धांपासून मार्क्सपर्यंतच्या तत्त्ववेत्त्यांचे विचार मला भावले. माझ्या कविता त्यांच्या प्रेरणेने घडतात. मात्र, त्यांच्या प्रकाशनाचा योग मित्रांमुळे आला.
यावेळी निनाद काळे यांनी
या कवितासंग्रहातील ‘हसन’
नावाची कविता सादर केली. तसेच कवितासंग्रहाच्या निर्मितीत
विशेष योगदान दिल्याबद्दल तनुजा शिपूरकर, रवी सरदार, सीमा
मुसळे, मीना मंगळूरकर यांचा
सत्कार करण्यात आला. धनाजी
गुरव यांनी प्रास्ताविक केले.
सीमा मुसळे यांनी पुस्तकाच्या संपादनामागील भूमिका विशद केली. तर गौतम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Prometheus poem'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.