सिटी मॉलची मोजणी करण्याचे आश्वासन, कदम बंधूंचे उपोषण : जागेवर जाऊन मोजणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:10+5:302021-04-07T04:26:10+5:30
कोल्हापूर : डीवायपी सिटी मॉलची येत्या चार दिवसांत मोजणी करून त्यांच्या घरफाळ्याची आकारणी अंतिम करण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिकेचे ...
कोल्हापूर : डीवायपी सिटी मॉलची येत्या चार दिवसांत मोजणी करून त्यांच्या घरफाळ्याची आकारणी अंतिम करण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे व सहायक आयुक्त विनायक औधकर यांनी दिले. आश्वासन लेखी दिल्याशिवाय कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर तसे लेखी देण्यात आले.
येथील डीवायपी सिटी मॉलचा घरफाळा चुकीच्या पद्धतीने आकारणी झाल्याचा आरोप करून योग्य ती आकारणी करावी, अशी मागणी माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी महापालिकेकडे केली आहे. मंगळवारी सुनील कदम व सत्यजित कदम यांनी ताराराणी मार्केट येथील विभागीय कार्यालयासमोर दिवसभर उपोषण केले; परंतु त्यांना भेटायला कोणी अधिकारी अथवा कर्मचारी गेले नाहीत. सायंकाळी साडेपाच वाजता दोघे महापालिकेत आले. त्यांनी उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औधकर यांची भेट घेतली. जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर पडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.
तक्रारीच्या अनुषंगाने सिटी मॉल मिळकतीची प्राथमिक कर आकारणी करण्याची प्रक्रिया सुरू असून जागेवर जाऊन मोजमाप घेण्याच्या संदर्भात विभागीय कार्यालयाचे अधीक्षकांना शुक्रवारी भेट देऊन प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अधीक्षकांच्या प्रस्तावानंतर कर आकारणी अंतिम करण्यात येईल, असे पत्र उपायुक्त मोरे यांनी दिले. त्यानंतर कदम बंधू कार्यालयातून बाहेर पडले.