एकांकिका स्पर्धेत युवा कलाकारांकडून नाट्यकलेचे आश्वासक सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:12+5:302020-12-30T04:33:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील युवा कलाकारांनी आपल्या नाट्यकलेचे आश्वासक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील युवा कलाकारांनी आपल्या नाट्यकलेचे आश्वासक सादरीकरण केले.
पहिल्या सत्रात आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान इचलकरंजी संघाने ‘कस्तुरी’ ही एकांकिका सादर केली. अपघातामुळे माणसाला केवळ शारीरिक अपंगत्व येत नाही, तर त्याचे मनही पंगू होते आणि आपण प्रयत्न केला, तर त्यातूनही यश प्राप्त करू शकतो, असा आशय एकांकिकेमध्ये होता. नटाक नाटुकली कोल्हापूर संघाने ‘आषाढी’ ही एकांकिका सादर केली. यामध्ये जिथे माणसाला मनाचे समाधान लाभते तिथेच त्याचा देव असतो, असा संदेश देणारी वारकरी सांप्रदायाच्या पार्श्वभूमीवर ही एकांकिका होती.
रूद्रांश ॲकॅडमी कोल्हापूरने ‘जीर्णोद्धार’ ही एकांकिका सादर केली. वेठबिगारी समाजात असणारे अठराविश्वे दारिद्र्य, कर्ज आणि त्यातून होणारी नात्यांमधील कसरत यामध्ये दाखविली गेली आहे. ब्रिज क्रिएशन सांगली संघाने ‘कॉल गर्ल’ ही एकांकिका सादर केली. स्वत:च्या पत्नीची दलाली करणारा नवरा आणि एक बिझनेसमन यांच्यातील नैतिकता व अनैतिकतेची चर्चा यामध्ये होती. दुसऱ्या सत्रात हेल्पिंग बडीज सांगली संघाने ‘द ब्लॅक रुम’ ही एकांकिका सादर केली. कंपनीने केलेल्या हलगर्जीपणामुळे आपली बायको आणि मुलाला गमावलेल्या माणसाने सूड घेण्याचा केलेला प्रयत्न यामध्ये दाखविला आहे. त्यानंतर राणाप्रताप सांस्कृतिक कुपवाड संघाने ‘इमोशन्स बाय द बे’ ही एकांकिका सादर केली.
शेवटच्या सत्रात गायन समाज देवल क्लब कोल्हापूर संघाने ‘काय राव’ ही एकांकिका उत्कृष्ट सादर केली. वृद्धापकाळात पुनर्विवाहाचा विचार केल्यानंतर वृद्ध व्यक्तीस कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, याची शैली यामध्ये सादर केली. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या एकांकिका स्पर्धांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
(फोटो ओळी)
२९१२२०२०-आयसीएच-०२
इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जीर्णोद्धार ही एकांकिका रूद्रांश ॲकॅडमी कोल्हापूरने सादर केली.