राज्यात कृषी महोत्सवांना चालना देणार
By admin | Published: April 21, 2017 09:49 PM2017-04-21T21:49:47+5:302017-04-21T21:49:47+5:30
सदाभाऊ खोत ; कऱ्हाडला प्रीतिसंगम आंबा महोत्सवास प्रारंभ
कऱ्हाड : ‘शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी व शेतीमाल विक्री प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी महोत्सव आयोजित करण्याबरोबर अशा महोत्सवांना चालना देणार आहे,’ अशी ग्वाही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. येथील शेती उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ व शुअर शॉट इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रीतिसंगम महोत्सव या आंबा महोत्सव, गृहोपयोगी वस्तू व खाद्य जत्रेचे उद्घाटन शुक्रवारी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे उपसभापती आत्माराम जाधव, पणनचे विभागीय अधिकारी अनिल पवार, उपनिबंधक महेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. ए. खरात, शुअर शॉट इव्हेंटचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गिड्डे, बाजार समितीचे सचिव बी. डी. निंबाळकर, कोयना दूध संघाचे अध्यक्ष मारुती यादव, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, महानंदचे संचालक वसंतराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, फत्तेसिंह जाधव, मन्सूर इनामदार, शिवाजीराव जाधव, सुनील बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री खोत म्हणाले, ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकविलेला आंबा, कडधान्य, हळद, मसाले, भरडधान्य हे थेट ग्राहकांना विकता यावे यासाठी या पद्धतीचे महोत्सव प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. पणन मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
यावेळी मंत्री खोत यांनी महोत्सवात आंब्याचा आस्वाद घेतला. बाजार समितीचे संचालक विजय कदम, अमृतराव पवार, मोहन माने, सचिन गुणवंत, मन्सूर फकीर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची पावले प्रदर्शन स्थळाकडे वळू लागली आहेत. महोत्सवात आंबा, गृहोपयोगी वस्तूंची मोठी रेलचेल असून, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गजीनृत्य, सोमवारी डॉग-शो तर मंगळवारी आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.